जयंत पाटलांपुढे आता मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसचं आव्हान

विधानसभेच्या तोंडावर बालेकिल्ल्यात अर्थात इस्लामपुरात जयंत पाटील यांच्यासमोर नवं चॅलेंज समोर राहिलं आहे. तेही महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसचं. इस्लापुरात जयंत पाटील यांना पाठिंबा न देता स्वबळावर लढण्याची वक्तव्ये काँग्रेसकडून करण्यात येत आहे. याला कारण ठरतंय इस्लामपुरातील काँग्रेस कमिटीचं कार्यालय. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस कमिटीच्या नावे असलेल्या इमारतीचा ताबा जयंत पाटील यांनी त्यांच्या पक्षाकडे ठेवला आहे. ही जागा काँग्रेस पक्षाला परत केली, तरच पक्षाचे कार्यकर्ते निवडणुकीत त्यांचा प्रचार करतील, असा इशारा काँग्रेसनं दिला आहे.

इस्लामपूर येथील शासकीय विश्रामगृहात पक्षनिरीक्षक आणि आंध्र प्रदेशचे माजी मंत्री साके शैलजाथ आणि सहनिरीक्षक शशांक बावचकर यांनी वाळवा तालुक्यातील पक्ष संघटनेचा आढावा घेतला. या बैठकीत काँग्रेसला स्बवळावर लढण्याची संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.काँग्रेस पक्षाची जागा आणि इमारत काँग्रेसकडे सुपूर्द करावी. तर, विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांच्या प्रचारात सहभाग घेऊ, अशी आक्रमक भूमिका काँग्रेस पक्षानं घेतली. त्यामुळे आगामी काळात जयंत पाटील विरुद्ध काँग्रेस, असा संघर्ष चिघळण्याची चिन्हे आहेत.