शुभांशूचा अंतराळातून पहिला मेसेज, भारतीयांची मान गौरवाने उंचावली

भारताचे शुभांशू शुक्ला आणि इतर तीन अंतराळवीरांना घेऊन जाणाऱ्या अ‍ॅक्सिओम-4 मिशनने कैनेडी स्पेस सेंटरच्या कॉम्प्लेक्स 39ए वरून उड्डाण केले आहे. या यानाने भारतीय वेळेनुसार दुपारी 12.01 वाजता उड्डाण केले. उड्डाण केल्यानंतर शुभांशू शुक्ला यांनी अंतराळयानातून पहिला संदेश (First message) पाठवला आहे. “नमस्कार, माझ्या प्रिय देशवासीयांनो, What a ride… 41 वर्षांनंतर आपण पुन्हा अवकाशात पोहोचलो आहोत आणि ही एक अद्भुत राइड होती. सध्या आम्ही पृथ्वीभोवती 7.5 किलोमीटर प्रति सेकंद वेगाने फिरत आहोत. माझ्या खांद्यावर माझा तिरंगा आहे, जो मला सांगत आहे की मी एकटा नाही, मी तुमच्या सर्वांसोबत आहे.”, असा संदेश त्यांनी पाठवला.

अंतराळयानातून शुभांशू शुक्ला म्हणाले की ही माझ्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या प्रवासाची सुरुवात नाही, तर ही भारताच्या मानवी अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात आहे. मला असं वाटतं की, सर्व देशवासीयांनी या प्रवासाचा भाग व्हावं. तुमची छाती अभिमानाने आणखी फुगली पहिजे. तुम्हीही असाच उत्साह दाखवला पाहिजे. आपण सर्वांनी मिळून भारताचा हा मानवी अंतराळ प्रवास सुरू करूया.

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचल्यानंतर शुभांशू शुक्ला हे 1984 च्या राकेश शर्मा यांच्या मोहिमेनंतर या स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरतील. 28 तासांच्या प्रवासानंतर, अंतराळयान गुरुवारी दुपारी 4:30 वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) पोहोचेल अशी अपेक्षा आहे.