टी20 टीमचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या क्रिकेटपासून लांब आहे, आणि त्याचे कारण आता स्पष्ट झाले आहे. सूर्यकुमार यादवची स्पोर्ट्स हर्नियाची यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. सध्या रीकव्हरीच्या प्रक्रियेत आहे. जर्मनीमध्ये ही सर्जरी यशस्वीपणे पार पडली आहे. र्याने सोशल मीडियावर ऑपरेशननंतरचा फोटो शेअर केला आणि याबद्दल अपडेट दिली. 34 वर्षीय सूर्यकुमार यादवकडे रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाचा टी-२० कर्णधार म्हणून जबाबदारी सोपवली आहे.
सूर्यकुमार यादवनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. रुग्णालयाच्या बेडवर झोपेला हा फोटो आहे. त्याने हा फोटो पोस्ट करत लिहिलं, ‘लाइफ अपडेट – पोटाच्या उजव्या खालच्या भागात स्पोर्ट्स हर्निया झाल्यानं सर्जरी झाली आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे ऑपरेशन यशस्वी झालं आहे आणि आता बरा होण्याच्या मार्गावर आहे. लवकरात लवकर क्रिकेटच्या मैदानावर परतण्याची आतुरता आहे.”
सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या टेस्ट मालिकेनंतर भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाईल. तिथे टी20 मालिकेचे सामने 26 ते 31 ऑगस्टदरम्यान होतील. मात्र सूर्या त्या मालिकेसाठी उपलब्ध नसू शकतो. टी20 फॉर्मेटमधील पुढची मोठं स्पर्धा म्हणजे टी20 वर्ल्ड कप 2026, जो भारत आणि श्रीलंकेत फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी सूर्या भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे.