हातकणंगलेत यात्रेदरम्यान दोन गटांत तुंबळ हाणामारी!

आळते (ता. हातकणंगले) येथे श्री रेणुका देवी यात्रेत (Renuka Devi Yatra) पालखी सोहळा सुरू असतानाच जोगत्यांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली.

हाणामारीत काठी व दगडांचा वापर झाला. त्यात दोघे जखमी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. दोघांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.हा प्रकार मंगळवारी रात्री उशिरा पालखी गावात पोहोचल्यानंतर मंदिर परिसरात पोलिसांसमोरच घडला. त्याने प्रचंड गोंधळ उडाला.

पोलिसांनी (Hatkanangale Police) हस्तक्षेप करत दोन्ही गटांसह भाविकांना पांगवले. दरम्यान, गंभीर जखमीपैकी एकाचा मृत्यू झाल्याची अफवा होती. त्यामुळे पोलिसांची मध्यरात्री तारांबळ उडाली. याबाबत हातकणंगले पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा नोंद नाही. हे प्रकरण आपापसात मिटवल्याचे समजते.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आळते (ता. हातकणंगले) येथील श्री रेणुका देवीची यात्रा व पालखी सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मंगळवारी रात्री झाला.

एकीकडे पालखी सोहळा सुरू असताना दुसरीकडे मंदिर परिसरातील वादामुळे यात्रेला गालबोट लागले. मध्यरात्री बारानंतर विविध धार्मिक विधी होतात. त्यामुळे भाविक शक्यतो रात्री मुक्कामाला असतात.