माऊली , माऊलीच्या अखंड जयघोष आणि भक्तिभावाने भरलेल्या वातावरणात जगद्गुरू मच्छिंद्रनाथ (Machhindranath) महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा आटपाडीतील अंबाबाई मंदिर परिसरात मोठ्या भक्तिमय आणि उत्साहात पार पडला. या सोहळ्याला हजारो भाविक आणि वारकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत परंपरेचा वारसा जपला.
सावल्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आलेल्या वारकऱ्यांच्या गर्दीत मैदान गजबजून गेले होते. रिंगणासाठी सजवलेल्या मैदानात महिला आणि वारकऱ्यांनी टाळ,मृदूंग आणि भजनी मंडळाच्या गजरात फेऱ्या मारल्या. त्यानंतर पारंपारिकतेने अश्वांनी रिंगण पूर्ण केले.संपूर्ण परिसरात विठ्ठलनामाचा निनाद आणि टाळ – चिपळ्यांचा नाद गुंजत होता. हा रिंगण सोहळा गेली तेरा वर्षे अंबाबाई मंदिरासमोरील मैदानात आयोजित केला असून , यंदाही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भक्ती,परंपरा आणि एकतेचा अनुभव देणारा जिल्ह्यातील एकमेव रिंगण सोहळा यंदाही आटपाडीकरांच्या मनात कायमचा घर करून गेला. सकाळी तडवळे येथून निघालेली पालखी दुपारी आटपाडीच्या साई मंदिरात पोहचली. सायंकाळी सातभाई विठोबा मंदिराजवळ माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख , नगरपंचायत मुख्याधिकारी वैभव हजारे, कल्लेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप पाटील,प्रकाश दोंडे, जालिंदर चव्हाण, शिवाजी माळी , दत्तात्रय पाटील,बाबुराव गुरव आदींसह नागरिकांनी पालखीचे स्वागत केले.
दिंडीचालक मल्हारी जवाहरे , रथचालक जयराम देशमुख,दादासाहेब शेवाळे, चोपदार कृष्णत सुतार आणि भक्तांनी मिरवणुकीस साथ दिली. रिंगण पूर्ण झाल्यानंतर पालखी श्री कल्लेश्वर मंदिर , तांबडा मारुती मंदिर परिसरातील विसावली. भाविकांनी वारकऱ्यांचे स्वागत करत पाहुणचार दिला. रात्रीचा विसावा शहरात घेतल्यानंतर सकाळी पालखी माणगंगा साखर कारखाना मार्गे कौठुळीकडे रवाना झाली.