आटपाडी नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यातच काही भागात दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शहराला पाणी पुरवठा करणारी यंत्रणा जुनी आहे. वारंवार
पाईप फुटण्याची समस्या उद्भवते. वरचे वर खंडित होणारी वीज आणि दर मंगळवारी नियमितपणे दिवसभर गायब होणारी वीज पाणी पुरवठ्याच्या अडचणीत भर टाकत आहे.
नगरपंचायत परिसरात विविध प्रभागांनुसार पाणी देण्याचे काटेकोर नियोजन होत नाही. आटपाडीकरांना दररोज पाणी तर मिळतच नाही. चौथ्या किंवा पाचव्या दिवशी पाणी मिळते. म्हणजेच महिन्यातून जास्तीत जास्त आठ ते दहावेळा (दिवस) पाणी पुरवठा होतो. एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. पण पाणी मिळत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते.
चौंडेश्वरी कॉलनी परिसरात काळे आणि दूषित पाणी पुरवठा होत आहे. या पाण्याला दुर्गंधी येत आहे. त्यामुळे चौंडेश्वरी कॉलनी परिसरात आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्यापूर्वी नगरपंचायत प्रशासनाने स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवठा करावा. आरोग्य विभागाने पाण्याची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.