महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या (Thackeray) युतीचं पहिलं पाऊल विजयी मेळाव्याच्या निमित्तानं पडत असतानाच आज वरळीमधील डोममधून काही नवीन घोषणा होते का याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मनसेची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच म्हणजेच 19 वर्षांनी एकाच व्यासपीठावर दिसणार आहे. गेल्या काही वर्षातल्या महाराष्ट्राच्या राजकारणातल्या घडामोडी पाहता दोन्ही ठाकरेंनी एकत्र येणं ही दोघांचीही राजकीय अपरिहार्यता मानली जात आहे. असं असतानाच मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकमेकांमध्ये विलीन होणार की काय अशी चर्चाही दबक्या आवाजात सुरु आहे. अशातच भारतीय जनता पार्टीनेही या दोन्ही भावांना असाच काहीसा सल्ला दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मनसेची दमदार सुरुवात आणि पडझड
बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीतच राज ठाकरेंनी 2006 साली शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला. राज ठाकरेंनी पुढल्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला. मनसेच्या माध्यमातून त्यांनी मराठीचा मुद्दा आक्रमकपणे हाती घेतला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मवाळ झालेल्या शिवसेनेमुळं मराठी माणसाला मनसेच्या रुपानं नवा पर्याय सापडला होता. मनसेच्या परप्रांतीयांविरोधी आंदोलनामुळं मनसे लोकप्रियतेच्या शिखरावर गेली. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आले. नाशिकमध्ये मनसेला सत्ता मिळाली. मुंबई महापालिकेत, पुणे महापालिकेत नजरेत भरेल एवढे नगरसेवक निवडून आले.
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मनसेची ज्या दणक्यात राजकीय एंट्री झाली ती गती मनसेला राखता आली नाही. पुढच्या काळात मनसेची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. मनसेचे काही राजकीय निर्णय चुकलेही. मराठीसह मनसेनं हिंदुत्वाचा पुकारा करुन पाहिला पण त्यातही यश मिळालं नाही. मनसेच्या राजकीय यशाचा आलेख कायम उणे राहिला. 2024 ची लोकसभा निवडणूक मनसेनं लढवली नाही. 2024 च्या निवडणुकीत अडीचशे जागा निवडून मनसेला भोपळाही फोडता आला नाही. स्थापनेनंतर पहिल्यांदाच यंदाच्या विधानसभेत मनसेवर अशी वेळ आली आहे की त्यांचा एकही आमदार सभागृहात नाही.
राज ठाकरेंसारखीच अवस्था उद्धव ठाकरेंची झालीय. बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेना समर्थपणं सांभाळल्याचं दिसलं. 2014 ची लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला चांगलं यश मिळालं पण ते यश कायम भाजपनं मोदींच्या खात्यावर नोंदवलं. 2019च्या लोकसभेचं यशावरही भाजप कायम हक्क सांगत राहिला. उद्धव ठाकरेंनी 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमदारांच्या संख्येची पन्नाशी कायम राखली. पण या यशाला मर्यादा राहिली. 2019 ला महाविकास आघाडीच्या प्रयोगात उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद मिळालं खरं पण त्याची मोठी राजकीय किंमत त्यांना मोजावी लागली. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत उभी फूट पाडली. पुढं 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला अवघ्या 20 जागांवर समाधान मानावं लागलं.
भाजपाने दिला विलिनीकरणाचा सल्ला
याच साऱ्या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या दिवशीच भारतीय जनता पार्टीचे नेते आणि मंत्री विजय मुनगंटीवार यांनी दोन्ही ठाकरे बंधूंना एक खास सूचना केली आहे. “शक्य असेल तर दोन्ही भावांनी एकच पक्ष काढावा,” असं म्हणत मुनगंटीवारांनी दोन्ही पक्ष विलीन करण्याचा सल्ला दिला आहे. “दोन्ही भावांनी एकत्र यावं, एकत्र राहावं. आवश्यक असेल तर दोन पक्षांचा एक पक्ष करावा. आमच्या शुभेच्छा आहेत,” असं मुनगंटीवार म्हणालेत.
