बर्मिंगहॅममध्ये भारताने इंग्लंडविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकला. एजबॅस्टनच्या मैदानावर इंग्लंडला विजयासाठी 608 धावांचे लक्ष्य होते, पण बेन स्टोक्सची टीम दुसऱ्या सत्रातच 271 धावांवर ऑल आऊट झाली आणि भारताने 336 धावांनी मोठा विजय मिळवला. आकाश दीपने दुसऱ्या डावात सहा विकेट्स घेतल्या आणि सामन्यात एकूण 10 विकेट्स घेतल्या. धावांच्या आधारावर इंग्लंडविरुद्धचा हा भारताचा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. या विजयामुळे दोन्ही टीम्स मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहेत. या विजयानंतर विराट (Virat) कोहलीने भारतासाठी खास पोस्ट शेअर केली.
भारतीय टीमच्या या विजयानंतर अनेक क्रिकेट दिग्गजांनी टीमला शुभेच्छा दिल्या. विराट कोहलीने सोशल मीडियावर टीमला शुभेच्छा देताना लिहिले, “एजबॅस्टनमध्ये भारताचा शानदार विजय. निडरतेने खेळलात आणि इंग्लंडला सतत अडचणीत आणलात. शुभमनने बॅटिंग आणि फिल्डिंगमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले आणि सर्वांनी प्रभावी खेळ दाखवला. सिराज आणि आकाशने या पिचवर ज्या प्रकारे बॉलिंग केली, त्यासाठी त्यांचे विशेष कौतुक .”
भारताने एजबॅस्टन मैदानावर अद्याप एकही कसोटी सामना जिंकला नव्हता. भारताने येथे पहिला कसोटी सामना 1967 मध्ये खेळला. 2022 मध्ये इंग्लंडने चौथ्या डावात 378 धावांचा पाठलाग केला. पण यावेळी भारताने इंग्लंडला केवळ पराभूत केले नाही तर परदेशात धावांनी सर्वात मोठा विजयही मिळवला. भारतासाठी हा विजय खूप खास आहे. टीम इंडियाने या मैदानावर सुमारे सहा दशकांत विजय मिळवला आहे. या सामन्यात कर्णधार शुभमन गिलला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
