राज्यात १९५४-५५ पासून शिष्यवृत्ती योजना कार्यान्वित असून इयत्ता चौथी व सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना होती. २०१५च्या शासन निर्णयानुसार ही परीक्षा पाचवी व आठवीसाठी घेतली जाते. पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती’ ही शिष्यवृत्ती गुणवान विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहनात्मक दिली जाते.
चालू शैक्षणिक वर्षासाठी १८ फेब्रुवारीला एकाचवेळी शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. त्यासाठी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरले गेले आहेत.
इयत्ता पाचवीसाठी एकूण संच संख्या १६ हजार ६८३ एवढी असून इयत्ता आठवीसाठी १६ हजार २५८ संच संख्या आहे. दरवर्षी पाचवीच्या परीक्षेतून शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या आणि पुढे सहावी, सातवी व आठवीत शिक्षण घेणाऱ्या एकूण ५० हजार ४९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. तर आठवीच्या परीक्षेतून शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या आणि इयत्ता नववी व दहावीमध्ये शिकणाऱ्या ३२ हजार ५१६ विद्यार्थ्यांनाही वार्षिक शिष्यवृत्ती मिळते.
२०२१पर्यंत शिष्यवृत्ती प्राप्त नसलेल्या शिष्यवृत्ती धारकांनी आपल्या बँक खात्याची माहिती तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे बॅंक खात्याची अचूक द्यावी. www.eduonlinescholarship.com या संकेतस्थळावर गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून अपडेट झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्ती जमा होईल.
तर २०२१ नंतर शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती संबंधित शाळेने परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर शाळा लॉगीनद्वारे अचूक भरावी. शिष्यवृत्तीधारकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे संपर्क साधावा, असे उपसंचालक (योजना) राजेश क्षीरसागर यांनी आवाहन केले आहे.
२२ जुलै २०१०च्या शासन निर्णयाप्रमाणे २०२२-२३पर्यंत विद्यार्थ्यांना संचनिहाय जुन्या विविध दराने वार्षिक (इयत्ता पाचवीसाठी कमाल एक हजार व इयत्ता आठवीसाठी कमाल दीड हजार रुपये) शिष्यवृत्तीचे वितरण व्हायचे. चालू वर्षापासून सरसकट इयत्ता पाचवीसाठी पाच हजार रुपये तर आठवीसाठी साडेसात हजार रुपये, अशी शिष्यवृत्ती वाढविली आहे.