चॉकलेट हा असा खाद्यपदार्थ आहे, जो थोरामोठ्यांपासून सर्वांनाच आवडतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून चॉकलेट्स महागले आहेत. चॉकलेट तयार करण्यासाठी लागणाऱ्या कोको बिया महागल्यामुळे चॉकलेट्सही महागले आहे. दरम्यान, चॉकलेटनिर्मितीत आघाडीवर असलेली भारतातील अमूल (Amul) ही कंपनी आपल्या चॉकलेटच्या किमतीत वाढ करणार आहे. अमूलसह बस्किन रॉबिन्स, केल्लानोवा या कंपन्यादेखील चॉकलेटची किंमत वाढवण्याचा विचार करत आहेत.
अमूल हे ब्रँड गुजरातस्थित गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनच्या (जीसीएमएमएफ) मालकीचे आहे. जीसीएमएमएफचे एमडी जयेन मेहता यांनी अमूलच्या चॉकलेटचे दर हे 10 ते 20 टक्के वाढण्याचे संकेत दिले आहेत.एक किलो कोको बियांचा भाव 800 रुपये झाला आहे. हा दर अगोदर 150-250 रुपये होता. या भाववाढीमुळे चॉकलेट निर्मितीवर संकट आले आहे. डार्क चॉकलेट निर्मितीमध्ये आम्ही आघाडीवर आहोत.
या क्षेत्रात आमचा बाजारातील वाटा सर्वाधिक आहे. डार्क चॉकटेल तयार करताना कोको बियांची मदत घ्यावी लागते. मात्र या बियाच महाग झाल्यामुळे आता चॉकलेटचा दर वाढवावा लागेल. दोन महिन्यांत याबाबत निर्णय घ्यावा लागू शकतो,” असं जयेन मेहता म्हणाले आहेत.
