नाट्य पंढरी सांगलीमध्ये यंदाच्या शंभराव्या नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. सांगलीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात मुहूर्तमेढ सोहळा पार पडत आहे. मावळते अध्यक्ष प्रेमानंद गजवी, नियोजित अध्यक्ष जब्बार पटेल आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार,यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होत आहे. प्रशांत दामले (Prashant Damle) यांच्या हस्ते घंटा वाजवून संमेलन कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे.
यंदाचे नाट्यसंमेलनाचे शंभरावे वर्ष असल्याने ते ठिकठिकाणी साजरे करण्यात येणार आहे. पुणे पिंपरी चिंचवड, अहमदनगर, बीड मुंबई इथेही संमेलन होणार असून समारोप रत्नागिरी या ठिकाणी होणार आहे. तत्पूर्वी नाट्य पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या सांगलीतून या संमेलनाच्या शताब्दी वर्षाचा मुहूर्तमेढ रोवला जातोय. या निमित्ताने दोन दिवस सांगलीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
नाट्यसंमेलनाच्या मुहूर्तमेढ कार्यक्रमादरम्यान नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले (Prashant Damle) म्हणाले,”गेली 40 वर्षे मी पाठ केलेले संवाद बोलत आहे. आज नाट्यसंमेलनाच्या माध्यमातून असं पहिल्यांदाच बोलत आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री, उदय सामंत, शरद पवार ही सर्व मंडळी नाट्यवेडी आहेत. ही मंडळी नेहमीच आमच्या पाठिशी आहेत. आम्हाला काय हवंय आणि काय नकोय हे त्यांना माहिती आहे”.
प्रशांत दामले पुढे म्हणाले,”नाटक म्हटलं की त्यात नाट्य हवं. मी नाटकवाला असल्याने मला प्रत्येक कामात नाट्य लागतं. नाट्य संमेलनादरम्यान नव्या गोष्टी शिकायला मिळत आहेत. एकावेळी सगळे कलाकार एकत्र येण्यासाठी नाट्यसंमेलन ही योग्य जागा आहे. नवोदित कलाकारांना मार्ग दाखवण्याचे काम नाट्यपरिषदेकडून केलं जाणार आहे. नाट्यसंमलेनासाठी महाराष्ट्र शासनाने खूप मदत केली आहे. महाराष्ट्रतुन वेगवेगळ्या भागातून मुंबईत येणाऱ्या नवोदित कलाकाराची राहण्याची अडचण आहे. शासनाने या कलाकारांची राहण्याची सोय करावी. नाट्य परिषदेकडून या नवोदित कलाकारांच्या राहण्याची आम्ही व्यवस्था करू”.
सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार नाट्यसंमेलनाच्या मुहूर्तमेढदरम्यान म्हणाले,”आज सर्व नाट्यवेडे सांगलीत आले आहेत. नाटकाला वाईट दिवस कधीच येऊ शकत नाही. 100 व्या मराठी नाट्य संमेलनातून एक हजार नाट्य संमेलनापर्यतची चळवळ नेण्याचा प्रयत्न केला जाईल. महाराष्ट्र मध्ये आम्ही 75 अत्याधुनिक नाट्यगृह बनवणार आहोत, नाट्यगृहात सोलर असावेत असा प्रयत्न आहे. मी वनमंत्री असलो तरी सांस्कृतिक विभाग नाट्य कलाकाराच्या मागे उभा आहे. कारण माझ्या खात्याकडे असलेल्या लाकडापासून कागद बनतो आणि तोच कागद अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे जातो”