लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला. 1900 सालानंतर पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला असून यामुळे क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. टी 20 फॉरमॅटमध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल. या स्पर्धेच्या तारखा आता जाहीर करण्यात आलेल्या आहेत.
कधी खेळवला गेला शेवटचा सामना?
ऑलिम्पिकमध्ये 128 वर्षांपूर्वी झालेल्या ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यात शेवटची क्रिकेट स्पर्धा पार पडली होती. या सामन्यात ग्रेट ब्रिटनने फ्रान्सचा 185 धावांनी पराभव केला आणि सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश केल्याने क्रिकेटप्रेमींचा आनंद गगनात मावत नाहीये.
18 दिवस चालणार स्पर्धा :
12 जुलै 2028 पासून 29 जुलै 2028 पर्यंत क्रिकेटचे सामने ऑलिम्पिकमध्ये खेळवण्यात येणार असून जवळपास 18 दिवस ही स्पर्धा सुरु राहणार आहे. कॅलिफोर्नियातील पोमोना येथील फेअरग्राउंड्स क्रिकेट स्टेडियममध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. क्रिकेट सामन्यांचा पहिला टप्पा 12 ते 18 जुलै दरम्यान होईल , त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील सामने 22 ते 28 जुलै दरम्यान होतील. अंतिम सामना 29 जुलै रोजी फेअरग्राउंड्स क्रिकेट स्टेडियमवर होईल.
सहा संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतील :
ऑलिम्पिक स्पर्धेसाठी संघांची निवड ही आयसीसी टी20 संघांच्या क्रमवारीच्या आधारे होणार आहे. सहा संघ हे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतील. क्रमावारीनुसार पहिल्या सहा संघांचा विचार जाईल. लॉस एंजेलिस ऑलिंपिकचे आयोजन करणाऱ्या यूएसए संघाला क्रिकेट स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. भारत, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, इंग्लंड, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडीज, झिम्बाब्वे यातील 6 संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतील. या स्पर्धेत 6 पुरुष आणि 6 महिला क्रिकेट संघ असणार आहेत.
