गुटखा, मावा, गांजा त्यानंतर आता मेफेंटरमाईन सल्फेट आणि मेफेड्रॉन (एमडी) देखील सहज मिळू लागल्याने वस्त्रनगरीत नशेचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. झटपट पैसा मिळवण्यासाठी युवकांकडून सुरू असलेला हा प्रकार वेळीच रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यासाठी जुजबी कारवाई न करता पोलिसांनी (Police) जबर शिक्षेची तरतूद असलेले कलम लावण्याची गरज आहे. तरच याला कायमस्वरूपी आळा बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
औद्योगिक नगरी असलेल्या इचलकरंजी शहरात कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय परप्रांतातून मोठ्या प्रमाणात अनेक कुटुंब तसेच युवक रोजीरोटीसाठी शहर आणि परिसरात वास्तव्यास आहेत. कामगारांमधील अशिक्षितपणा, कौटुंबिक अस्वास्थ्य, आर्थिक ओढाताण, कर्जबाजारीपणा, कामाचा ताण यासह अन्य कारणामुळे कामगार व्यसनात गुरफटून जात आहे. याशिवाय महाविद्यालयीन युवक देखील चुकीच्या संगतीने नशेच्या आहारी जाताना दिसत आहेत. अनेकजण गुटखा, मावा, खैनी, तंबाखू याच्या आहारी गेले आहेत. तर काही युवक याच्याही पुढे जाऊन नशा करताना दिसत आहेत. यासाठी नशेचे इंजेक्शन यासह अन्य मार्गांचा अवलंब केला जात आहे. यातूनच गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अंमली पदार्थ बाळगणे अथवा सेवन करणाऱ्यांवर पोलीस स्वतःहून कधीच कारवाई करत नाहीत. कोणीतरी माहिती दिली तरच गुन्हा दाखल केला जातो. त्यामध्येही जुजबी कलम लावले जाते. परिणामी तो सहजपणे सुटतो. गुन्हा दाखल झाल्यानंतरही काहीच होत नाही, हे समजल्यावर त्याचे धाडस आणखी वाढते. अशावेळी मात्र याला आवर घालणे अवघड होते.
गुटखा तसेच सुगंधीत तंबाखूवर बंदी आहे. तथापि कर्नाटक सिमा भागातून याची चोरटी आयात होते. याशिवाय याला पर्याय म्हणून पान टपरीतून मावा वितरीत केला जात आहे. नशा येण्यासाठी यामध्ये गांजासह अन्य घटकांचा वापर केला जातो. यामुळे याची चटक लागते. त्यातूनच युवा पिढी तसेच महाविद्यालयीन युवक बरबाद होताना दिसत आहेत. शहर तसेच ग्रामीण भागातही एकाच नावाच्या असलेल्या या टपऱ्या खास माव्यासाठी प्रसिध्द असल्याचे दिसते. या टपऱ्यातून कोणता उद्योग चालतो याची जाणीव पोलिसांना देखील आहे. मात्र, कारवाई केली जात नव्हती. परिणामी अवैध उद्योगाला एकप्रकारे बळ देण्याचाच हा प्रकार असल्याची शंका सामान्य नागरिकातून व्यक्त केली जात आहे. याविरोधात वेळीच यावर कारवाई केली असती तर हा प्रकार थांबला असता. मात्र, आता त्याही पुढे जाऊन नशेसाठी इंजेक्शन तसेच एमडी ड्रग घेण्याच्या प्रकारामुळे वस्त्रनगरी पुरती हादरून गेली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी गुटखा, मावा विक्रेत्यांवर कारवाईचे धाडसत्र सुरू केले आहे. तथापि ज्या ठिकाणी टपरी आहे त्याच्या अवतीभोवती अद्यापही चोरीछुपे हा उद्योग सुरू आहे. त्यामुळे नशेचा हा काळा बाजार कायमस्वरूपी बंद करण्यासाठी जबर शिक्षेची तरतूद असणारे कलम लावणे नितांत गरजेचे आहे, तरच याला आळा बसणार आहे. अन्यथा गुन्हेगार मोकाट सुटतीलच शिवाय युवा पिढी बरबाद होऊन शहरातील कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
