राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीपूर्वी एक महत्त्वाचा आणि महिलांसाठी अत्यंत दिलासादायक निर्णय राज्य निवडणूक आयोगाने (Election Commission) घेतला आहे. या निर्णयानुसार, आता महिला उमेदवारांच्या दोन्ही माहेरच्या आणि सासरच्या नावाचा देखील समावेश इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन EVM वर केला जाणार आहे.
आतापर्यंत कोणत्याही उमेदवाराचे EVM वर फक्त मतदार यादीतील नावच छापले जात होते. त्यामुळे अनेक विवाहित महिलांना आपले सासरचे आडनाव वापरण्याची इच्छा असूनही त्यांच्या मतदार यादीतील माहेरच्या नावामुळे ईव्हीएमवर सासरचे नाव दाखवता येत नव्हते.
मात्र, आता निवडणूक आयोगाने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे अशा महिला उमेदवारांना दोन्ही आडनावे माहेरचे आणि सासरचे एकत्र EVM वर दाखवण्याची परवानगी मिळणार आहे. सासरचे नाव कंसात देण्यात येईल. ईव्हीएमवर नाव छापण्यासाठी मर्यादित जागा असते. त्यामुळे दोन्ही नावं देण्यात येणार असली तरी ती त्या जागेत बसतील इतकीच लांबी असावी लागणार आहे. म्हणजेच संक्षिप्त स्वरूपात दोन्ही नावे दिली जाणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे महिलांना केवळ मतदार यादीतील ओळखीपुरतं नव्हे तर राजकीय ओळखीतही दोन्ही कुटुंबांशी नातं अधोरेखित करण्याची संधी मिळणार आहे. एखाद्या महिलेचे सासर राजकारणात सक्रिय असले आणि तिचे माहेरही राजकीयदृष्ट्या प्रभावी असेल तर ती आता दोन्ही आडनावांनी मतदारांपुढे उभी राहू शकते.
दोन्ही नावे बदलण्यासाठी असा करा अर्ज
उमेदवारी अर्जात मतदार यादीतील नाव देणे बंधनकारक आहे. जर उमेदवारास मतपत्रिकेवर इतर नाव उदा. सासरचे नाव दाखवायचे असेल तर तिने अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे याबाबत वेगळा अर्ज करावा लागेल. या अर्जासोबत पुरावे जोडणे अनिवार्य आहे. उदा. विवाह नोंदणी प्रमाणपत्र, राजपत्रात प्रसिद्ध केलेले नाव किंवा आयोगाने मान्य केलेल्या 17 ओळख पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा.
