अजित पवारांना धक्का……

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे मावळ आणि पिपरी चिचवड मधील विश्वासू सहकारी संजोग वाघेरे (Sanjog Waghere Shiv Sena) यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय.  शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थित वाघेरे यांनी मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश केला. मुंबईत उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले. “उद्धव ठाकरे यांचे मी आभार मानतो. त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिवसेनेत प्रवेश दिला. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच कोरोनाच्या साथीमध्ये महाराष्ट्र मध्ये कोरोनाला आपण रोखू शकलो. त्यांनी उत्तम प्रकारे राज्याला मार्गदर्शन केलं”,  असे संजोग वाघेरे म्हणाले. वाघेरे यांच्या पक्षप्रवेशावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ’50 खोके एकदम ओके’ अशा घोषणा दिल्या आहेत. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, आमदार सचिन अहिर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

पन्नास खोके आणि इकडे स्कॉर्पियो बुलेरो लाथाडून संजोग हे शिवसेनेत आलेले आहेत. शिवसेनेच्या या परिवारात उद्धव ठाकरे यांनी सामावून घेतलंय. आम्ही शिवसेनेच्या बाबतीत भावूक आहोत पण आता आपल्याला लढायचं आहे, असे संजय राऊत म्हणाले. 2023 मावळताना शिवसेनेचा सूर्य 2024 मध्ये तेजाने उगवताना दिसेल.  मावळ मतदारसंघ आपल्याला परत खेचून आणायचा आहे. याची जबाबदारी संजोगजी तुमच्याकडे आहे. ज्यांनी महाराष्ट्रचा, मातोश्रीचा अपमान केला, त्यांना आता आपली ताकद दाखवायची आहे, असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.

मला भेटल्यावर तुम्ही भावूक झाला म्हणालात. मला भावूक आणि घाऊक याचा फरक कळायला लागला. ज्यांनी 50 खोके घेतले त्यांना आता खोक्यामध्ये बंद करायचं आहे.  गद्दार आणि स्वाभिमानी हा फरक संजोग यांनी दाखवला.   

जिथे सत्ता असते तिथे गर्दीचा ओघ असतो. पण इथे वेगळे आहे. मला प्रचाराला यायची तिकडे गरज नाही. आजच भगवा तिकडे मावळमध्ये फडकला. हा मावळ मतदार संघ वेगळा आहे. मी प्रचाराला तर येईलच. त्यांच्याकडे पर्याय कोणी नाहीये.नरेंद्र मोदी यांचं कर्तृत्व 10 वर्ष पाहिले आहे.  होऊ दे चर्चा कार्यक्रम गावागावात सुरू करा.  आता निवडणूक कशी जिंकायची हे मला सांगायची गरज नाही. जिथे शिवाजी महाराज जन्माला आले तिथे आता गद्दारी गाडायची आहे.

संजोग वाघेरे कोण आहेत?

# माजी महापौर दिवंगत भिकू वाघेरे यांचे ते पुत्र आहेत. 
# संजोग वाघेरे राष्ट्रवादीच्या तिकिटावर तीन वेळा नगरसेवक राहिलेत
# महापौर म्हणून त्यांनी कारभार पाहिलाय
# त्यांच्या पत्नी ही नगरसेविका होत्या
# स्थायी समितीचे अध्यक्ष पद ही त्यांनी भूषवले आहे
# संजोग वाघेरे राष्ट्रवादी चे सलग 8 वर्षे शहराध्यक्ष राहिलेत
#शरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून या कुटुंबाकडे पाहिलं जातं