वयोवृध्द दाम्पत्यास विळ्याचा धाक दाखवून दीड लाखाची चोरी

पेठवडगाव, वडगाव-भादोले रस्त्यावरील मसोबावाडी फाटा येथील घरातील वयोवृद्ध दाम्पत्याला विळ्याचा धाक दाखवून दीड लाखाचे सोन्या चांदीचे दागिन्यांची जबरी चोरी करुन तीन चोरट्यांनी दरोडा टाकला. ही घटना सोमवारी (दि. २८) पहाटे चारच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद वडगाव पोलीसात झाली. फिर्याद प्रविण महादेव मनवाडे (वय ३६ रा. मसोबावाडी फाटा, भादोले ता. हातकणगंले जि. कोल्हापुर) यांनी दिली. सोन्याचा १० ग्रॅम वजनाचा नेकलेस, सोन्याचे ३ ग्रॅम वजनाचे कानातील फुले पाच ग्रॅमचे सोन्याचे मंगळसुत्र, चांदीचा मेखला असा मुद्देमाल जबरी चोरी झाला. तिघा चोरट्यांपैकी एक अंदाजे ३५ वर्ष वयाचा तर दुसरा १४ ते १५ वयाचा असे संशयित चोरट्यांचे वर्णन फिर्यादीने सांगितले आहे. घटनास्थळी जयसिंगपूरच्या उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंके यांनी पाहणी केली.