गेल्या वर्षभरापासून दरवाढीची आशा बाळगणाऱ्या सोयाबीन (Soybean) उत्पादक शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा संपल्यासारखी वाटत असली, तरी प्रत्यक्षात दर वाढले असतानाही त्यांच्या हाती काहीच येत नाही. कारण, बहुतेक शेतकऱ्यांनी यंदा कमी दर मिळत असल्याने आधीच आपला माल विकून टाकला आहे. सध्या सोयाबीनचे दर 450 रुपये पर्यंत वाढले असले, तरी शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी सोयाबीन उरलेलेच नाही.
केडगाव परिसरातील अहिल्यानगर बाजार समितीत सोमवारी फक्त 66 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. त्याला 4200 ते 4450 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. मागील काही आठवड्यांपासून सोयाबीनच्या दरात हळूहळू वाढ होत असून तो आता 4500 रुपयांच्या घरात पोहोचला आहे. मात्र, शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी सोयाबीन उरलेले नाही. अनेकांनी दिवाळीच्या दरम्यान दर वाढतील, या आशेने माल रोखून धरला होता. पण अपेक्षा फेल ठरल्या आणि गरजेपोटी कमी दरातच विक्री करावी लागली.
यंदाच्या वर्षी केंद्र सरकारने हमीभावात 426 रुपयांची वाढ करत 5328 रुपये प्रति क्विंटल दर निश्चित केला आहे. मात्र, त्याचा प्रभाव प्रत्यक्षात हंगाम सुरू झाल्यावरच दिसून येईल.सोयाबीन हे आंतरराष्ट्रीय बाजाराशी निगडीत पीक असल्याने, जागतिक स्तरावर होणाऱ्या घडामोडींचा याच्या दरावर थेट परिणाम होतो. सध्या जागतिक बाजारात सोयाबीन तेलाची मागणी वाढत आहे, त्यामुळे देशांतर्गत दरात वाढ होताना दिसते आहे.
गतवर्षी नाफेडने मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी केल्याने शासनाकडे साठा मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहे. मागील दोन महिन्यांपासून नाफेडने साठा विक्रीस काढला आहे. त्यामुळे बाजारातील मागणी-पुरवठा ताळमेळ काहीसा बदलला असून दर वाढले आहेत.
