नागपूर आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारी देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस आज (10 ऑगस्ट) पासून धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळूरू येथून ऑनलाईन पद्धतीने या गाडीला हिरवा झेंडा दाखवून या वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ करणार आहेत. ही महाराष्ट्रातील 12 वी वंदे भारत एक्सप्रेस असून पुणे-नागपूर मार्गावर धावणारी ही आतापर्यंतची सर्वात जलद एक्सप्रेस ठरणार आहे.
ही वंदे भारत एक्सप्रेस नागपूर आणि पुणे (Nagpur to Pune) दरम्यान धावेल. विशेष म्हणजे वर्धा–मनमाड दरम्यानच्या भागाला ही पहिलीच वंदे भारत सेवा मिळत आहे. सरासरी 73 किमी प्रतितास वेगाने ही वंदे भारत ट्रेन धावेल आणि प्रवाशांना कमी वेळात लांबचा प्रवास पूर्ण करता येणार आहे.
वेळापत्रक?
नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा ट्रेन क्रमांक 26101 (पुणे–अजनी) आठवड्यातून 6 दिवस (मंगळवार वगळता) सकाळी 6:25 वाजता पुणे स्थानकावरून सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी 6:25 वाजता अजनी येथे पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 26102 (अजनी–पुणे) आठवड्यातून 6 दिवस (सोमवार वगळता) सकाळी 9:50 वाजता अजनी स्थानकावरून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 9:50 वाजता पुण्यामध्ये पोहोचेल.
कोणत्या ठिकाणी थांबणार?
ही वंदे भारत एक्सप्रेस दौंड कॉर्ड लाईन, नगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा आणि वर्धा येथे रेल्वे स्थानकावर थांबणार आहे.
