महायुतीचा धर्म पाळत सुहास बाबर व वैभव पाटील हे महायुतीचे उमेदवार खासदार संजय पाटील यांच्या प्रचारसभांना उपस्थित राहत आहेत. परंतु, त्यांचे समर्थक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी वेगळ्या वाटेने जाण्याचा निर्णय घेतला आहे. अपक्ष
उमेदवार विशाल पाटील मंगळवारी विटा परिसरात दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पाटील व बाबर गटातील प्रमुख पदाधिकारी व माजी नगरसेवकांची घरी जाऊन भेट घेतली.
त्यानंतर काही माजी नगरसेवक व विशाल पाटील यांची रात्री एकत्र बैठक झाली. खानापूर आटपाडी विधानसभेचे शिंदेसेनेचे दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर व राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष अॅड. वैभव पाटील हे युतीसोबत, तर समर्थक कार्यकर्ते बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यासोबत असल्याचे चित्र मंगळवारी दिसून आले. दोन्ही गटांतील काही नगरसेवक व कार्यकर्त्यांची बंडखोर विशाल पाटील यांच्यासोबत तासगाव रस्त्यावरील माजी नगरसेवक महेश कदम यांच्या बंगल्यात मंगळवारी रात्री बैठक झाली.