चेन्नई सुपर किंग्सचा अविभाज्य भाग राहिलेला रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) 2025 च्या सिजनमध्ये (IPL 2025) अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने 14 पैकी फक्त 9 सामने खेळले, जे त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच घडले. यानंतर अश्विन संघातून बाहेर जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अलीकडे काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला की अश्विन सीएसकेपासून वेगळा होऊ इच्छितो आणि पुढील हंगामात तो पिवळ्या जर्सीत दिसणार नाही. मात्र, या सगळ्यावर आता अश्विनने स्वतःच भूमिका स्पष्ट केली आहे.
यूट्यूबवर दिले स्पष्टीकरण
आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना अश्विन म्हणाला, “माझ्या आयपीएल कारकिर्दीत पहिल्यांदाच मी फक्त 9 सामने खेळलो. नेहमी मी पूर्ण हंगाम खेळून संघासाठी 100 टक्के देतो, पण यावेळी ते शक्य झाले नाही. सीजनदरम्यान मी व्यवस्थापनाला माझ्या भूमिकेबद्दल विचारले होते.”
निर्णय फ्रँचायझीचा?
अश्विन पुढे म्हणाला, “खेळाडूला पुढे खेळायचे आहे का, करार वाढवायचा आहे का? हा निर्णय आता खेळाडूकडेही असतो. सीजन संपल्यानंतर मी फक्त संघाकडून उत्तर मागितले. सध्या माझ्या हातात काही नाही. अफवा नेहमी खेळाडूकडून येतातच असे नाही. संजूच्या बाबतीतही तसेच झाले. काहीवेळा या गोष्टी फक्त अफवा असतात किंवा फ्रँचायझीकडून येतात.”
तसं पाहता, अश्विनचा सीएसकेशी असलेला प्रवास अद्याप संपलेला नसला, तरी पुढील हंगामात तो कोणत्या रंगाच्या जर्सीत दिसेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
