अमेरिका आणि रशिया या दोन्ही महासत्ता राष्ट्रांमध्ये घडणाऱ्या लहानमोठ्या घडामोडींचे परिणाम सर्वदूर जगभरातील इतर देशांपर्यंतही दिसून येतात. त्यातच सर्वाधिक मोठी घडामोड नुकतीच घडली असून, जागतिक स्तरावर सर्वच माध्यमांचं लक्ष या एका बहुप्रतिक्षित भेटीकडेच लागल्याचं स्पष्ट झालं. ही भेट होती रशिया आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षपदी असणाऱ्या जगातील दोन महत्त्वाच्या व्यक्तींची. अर्थात, ही भेट होती व्लादिमीर पुतिन (Putin) आणि डोनाल्ड ट्रम्प यांची.
अलास्काच्या एंकोरेज इथं ट्रम्प आणि पुतिन यांची भेट झाली आणि या बैठकीतून पश्चिमी रशियातील तणावावर काही अंशी तोडगा निघाल्याचंही म्हटलं गेलं. शुक्रवारी साधारण तीन तासांसाठी पुतिन आणि ट्रम्प यांच्याल मोठी शिखर बैठक आणि चर्चा झाली. ज्यानंतर या दोन्ही नेत्यांनी माध्यमांना संबोधित केलं. 2018 मध्येसुद्धा पुतिन यांनी ट्रम्प यांच्यासह संयुक्त पत्रकार परिषदेत सहभागी होत साऱ्या जगाचं लक्ष वेधलं होतं. दरम्यान, यावेळच्या भेटीची संधी साधत पुतिन यांनी इतिहास, भूगोल आणि अमेरिकेसह असणाऱ्या ‘शेजारी’ राष्ट्र धोरणांवर अधिक भर दिला. युक्रेनसोबतच्या युद्धबंदीसंदर्भातील अटींवर मात्र त्यांनी कोणत्याही स्वरुपातील स्पष्टोक्ती दिली नाही.
अमेरिकी शिष्टाचारानुसार जेव्हा इतर कोणत्याही देशाचे राष्ट्रपती किंवा इतर कोणत्याही परदेशी नेत्याचं आपल्या देशात आगमन होत झालं असता संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये यजमानपद भूषवणाऱ्या अमेरिकेच्याच राष्ट्राध्यक्षांनीच सर्वप्रथम माध्यमांसमोर बोलणं अपेक्षित असतं. मात्र पुतिन यांनी ही परंपरा खंडित केल्याचं शुक्रवारी पाहायला मिळालं.
रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी फक्त रशियन भाषेतच पत्रकार परिषदेची सुरूवात केली नाही, तर 2 मीटर दुरूनच ट्रम्प यांचं अभिवादन स्वीकारलं आणि म्हटलं, ‘आजचा दिवस चांगला जावो… प्रिय शेजारी. तुम्ही व्यवस्थित असाल अशी मी आशा करतो.’ इतक्यावरच पुतिन थांबले नाहीत, तर त्यांनी अलास्काच्या इतिहासावर उजेड टाकत हा भाग कधीकाळी रशियाचाही होता, जो सध्या अमेरिकेचा भाग असल्याचं स्पष्ट केलं. अलास्काचा हा भाग अमेरिका आणि रशियाला ऐतिहासिक तत्त्वांवर एकत्र जोडणारा दुवा असून, ही दोन्ही राष्ट्र एकमेकांचे स्पर्धक नसून, ती एकत्र येत भागिदारीनं चांगलं काम करु शकतात असं सूचक विधान पुतिन यांनी केलं.
इथं दोन महासत्ता देशांचे राष्ट्राध्यक्ष भेटत असतानाच भारतासोबतच्या नात्यावर त्याचा नेमका कसा परिणाम दिसेल हाच प्रश्न जागतिक स्तराव अनेकांनी उपस्थित केला. साधारण तीन वर्षे मागं गेलं असता तेव्हापासूनच अमेरिकेसोबतचं नातं दृढ करण्यासाठी भारतानं मोठी गुंतवणूक केल्याचं स्पष्ट झालं. आशिया- पॅसिफीक क्षेत्रात चीनची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी अमेरिकेलाही भारताच्या आधाराची तितकीच गरज आहे. दरम्यान, असं म्हटलं जात आहे की, रशियाकडून तेल खरेदी सुरू असल्या कारणानं अमेरिकेनं भारतापासून दुरावा पत्करल्यास दोन्ही देशांमधील राजकीय नात्यात तणाव निर्माण होईल. आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अभ्यासकांच्या मते सध्या अमेरिकेनं भारतासंदर्भात घेतलेली भूमिका अतिशय वैयक्तिक स्वरुपातील असून, ट्रम्प सातत्यानं भारताला पाण्यात पाहत असल्याचं प्रतित होत आहे.
