काल थर्टी फर्स्ट पार्टी तसेच नव वर्षाच्या स्वागतासाठी अनेक पार्ट्यांचे अनेकजणांनी नियोजन केले होते. कोल्हापूर शहरात २०२३ या सरत्या वर्षाला निरोप देण्यासह २०२४ या नवीन वर्षाचे स्वागत करताना हुल्लडबाजी करणाऱ्या मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्याा चालकांवर पोलिसांनी कारवाई केली. शहरातील राजारामपुरी, शाहूपुरी. जुना राजवाडा, आणि लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सुमारे २०० मद्यपींवर कारवाई करण्यात आली.
मध्य रात्री उशिरापर्यंत पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. नवीन वर्षाचे स्वागत करताना काही हुल्लडबाजांकडून गोंधळ घातला जातो. ओपन बारमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवतो. मद्यपींकडून वाहनांचे अपघात होण्याचा धोका असतो. त्यामुळे पोलिसांनी शहरात ३३ ठिकाणी नाकाबंदी करून हुल्लडबाजांवर कारवाईचा बडगा उगारला. शहर वाहतूक नियंत्रण शाखेसह शाहुपुरी, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा पोलिसांसह प्रादेशिक परिवहन विभागाच्या तीन पथकांनी वाहनचालकांची तपासणी केली.
या कारवाईत सुमारे २०० मद्यपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. उघड्यावर बसून कोणीही मद्यप्राशन करू नये, यासाठी पोलिसांची गस्ती पथके तैनात होती. मध्यरात्री उशिरापर्यंत सुमारे ४०० पोलिस बंदोबस्तासाठी रस्त्यावर होते.