अटारी-वाघा बॉर्डरवरील बिटींग रिट्रीटसंदर्भात मोठा निर्णय

भारत आणि पाकिस्तान सीमेवर दर दिवशी अटारी वाघा बॉर्डर (Attari-Wagah border) इथं बिटींग रिट्रीट समारंभाचं आयोजन करण्यात येतं. मात्र काही दिवसांपूर्वीच जम्मू काश्मीरच्या पहगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर आणि त्यामागोमागच भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूर या कारवाईनंतर हा समारंभ अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला होता. काही दिवसांच्या विरामानंतर हा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आला असून, त्याच्या वेळा मात्र बदलण्यात आल्या आहेत. सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफनं त्यासंदर्भातील माहितीसुद्धा जारी केली आहे.

BSF च्या माहितीनुसार आता बिटींग रिट्रीट कार्यक्रम सायंकाळी 6 वाजल्यापासून 6 वाजून 30 मिनिटांदरम्यान, अर्ध्या तासाच्या कालावधीत पार पडेल. यापूर्वी हा संपूर्ण कार्यक्रम सायंकाळी साडेसहा वाजता सुरू होऊन 7 वाजेपर्यंत सुरू राहत. मात्र हवामानात होणारे बदल पाहता बीएसएफनं त्याची वेळ बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हवामानात होणारे बदल आणि लवकर पडणारा अंधार पाहता या कार्यक्रमाची वेळ बदलण्यात आल्याची माहिती बीएसएफनं दिली आहे. त्यामुळं अटारी- वाघा बॉर्डरच्या दिशेनं जाणाऱ्यांनी याची नोंद घ्यावी.

देशभक्ती ओसंडून वाहणाऱ्या अशा या कार्यक्रमात भारत आणि पाकिस्तानच्या सैनिकांकडून आकर्षक असं पथसंचलनाचं प्रदर्शन करण्यात येतं. दर दिवशी या कार्यक्रमांसाठी मोठ्या संख्येनं उपस्थितांची हजेरी पाहायला मिळते. पंजाबमधील अमृतसर इथं असणाऱ्या अटारी वाघा बॉर्डरवर पार पडणारा हा संपूर्ण कार्यक्रम दोन्ही देशांच्या सीमाभागात 1959 पासून पार पडत आहे. यामध्ये दोन्ही देशांचे राष्ट्रध्वज उतरवण्याची प्रक्रिया पार पडते.

अटारी वाघा जॉईंट चेक पोस्ट अमृतसरपासून जवळपास 30 किमी आणि पाकिस्तानच्या लाहोरपासून 22 किमी इतक्या अंतरावर आहे. दर दिवशी इथं साधारण 25000 नागरिक या सोहळ्याला प्रत्यक्ष अनुभवतात.