उंच चिनाब पूल ‘हवेत’ही प्रसिद्ध ! विमानाने जाताना वैमानिकाची खास घोषणा

श्रीनगरला विमानाने जाताना वैमानिक चिनाब रेल्वे पूल दिसताच आवर्जून त्याची घोषणा करतो आणि विमानातील प्रवासी या पुलाचे फोटो काढण्यासाठी विमानाच्या खिडक्यांपाशी एकच गर्दी करतात… जम्मू आणि काश्मीरमधील चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ जून रोजी केल्यानंतर केवळ दोन दिवसांतील श्रीनगरला जाणाऱ्या प्रत्येक विमानातील हे दृश्य सध्या दिसत आहे. या पुलाविषयीची उत्सुकता विमानातून छायाचित्रात पकडण्याचा प्रयत्न विमानप्रवासी करत आहेत.

रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार,वैमानिक विमान या पुलावरून जाताना त्याची विशेष घोषणा करत आहेत आणि प्रवासी जगातील या सर्वात उंच रेल्वे पुलाचे छायाचित्र काढण्यासाठी उत्सुकता दाखवत आहेत. चिनाब पूल (Chenab Bridge) सातत्याने प्रशंसा मिळवत आहे, असे रेल्वे बोर्डाचे माहिती आणि प्रसिद्धीचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार यांनी रविवारी सांगितले.

जम्मू आणि काश्मीरच्या भव्य दऱ्यांवरून जाणाऱ्या प्रत्येक विमानात एक क्षण खास असतो. विमान चिनाब दरीवर आल्यावर, ‘तुमच्या खाली जगातील सर्वात उंच रेल्वे-कमानी पूल, चिनाब पूल आहे’ ही घोषणा वैमानिक करतो आणि सगळे प्रवासी रोमांचित होतात, खिडक्यांकडे धावतात आणि आपल्या मोबाइल फोनवर या ऐतिहासिक चमत्काराचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास आणि चित्रे काढण्यास सुरुवात करतात.

प्रवासी टाळ्या वाजवतात आणि भारतीय अभियांत्रिकीचे कौतूक करतात, असे रेल्वे मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. हवेतून प्रवास करणाऱ्यांप्रमाणेच जमिनीवरील नागरिकांमध्येही पुलाविषयी उत्साह आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, जवळच्या गावांमधील आणि डोंगराळ प्रदेशातील स्थानिक रहिवासी वेगवेगळ्या कोनांतून पुलाचे छायाचित्र काढताना आणि व्हिडिओ रेकॉर्ड करताना दिसत आहेत. काहीजण इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर केलेले चित्रीकरण त्वरित शेअर करत आहेत. कुमार यांच्या मते, आकाशात उडणारी विमाने चिनाब पुलाची ‘व्ह्यूइंग गॅलरी’ बनली आहेत.