“पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून स्वदेशीचा नारा दिला. स्वदेशीतून समृद्ध भारत वगैरे हवेचे बुडबुडे सोडले. प्रेसिडंट ट्रम्प यांचे नाव न घेता त्यांनी अमेरिकेने लादलेल्या ‘टॅरिफ’विरुद्ध शब्दबाण सोडले. मोदी यांनी अमेरिकेने लादलेल्या आयात कराविरोधात ‘स्वदेशी’चा नारा देऊन काँग्रेस विचारसरणीचाच पुरस्कार केला. थोडक्यात, स्वदेशी आंदोलन सुरू करा, परदेशी मालावर बहिष्कार टाका. ही उपरती त्यांना ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या टॅरिफनंतर झाली,” असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
“पंतप्रधान मोदी (Modi) यांनी मागच्या दहा वर्षांत काँग्रेस विचारधारेवर हल्ला करण्याची एकही संधी सोडली नाही, पण ‘स्वदेशी आंदोलन’ ही काँग्रेस विचारधारेची देणगी आहे. ब्रिटिशांनी त्यांची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी, भारतासारख्या देशातील बाजारपेठा हस्तगत करण्यासाठी ब्रिटनमधला पक्का माल भारतात आणला व येथील कच्चा माल कवडीमोल किमतीला ब्रिटनला नेला. त्यामुळे येथील हातमाग, गिरण्या, कापूस उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आले. त्याविरोधात काँग्रेसचे दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांनी ‘स्वदेशी’ची चळवळ सुरू केली. स्वदेशी माल वापरा. विशेषतः खादीचे कापड वापरण्यासाठी आग्रही भूमिका स्वदेशी आंदोलनाद्वारे काँग्रेसने उभी केली. परदेशी मालावर बहिष्कार व परदेशी मालाची होळी सुरू झाली. त्या आंदोलनात मुंबईत बाबू गेनूसारख्या काँग्रेस कार्यकर्त्यांना हौतात्म्य पत्करावे लागले. स्वदेशी आंदोलनाचा संबंध स्वातंत्र्य लढ्याशी व देशभक्तीशी होता आणि काँग्रेसने हे आंदोलन सुरू केले,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.
“प्रेसिडंट ट्रम्प यांनी ‘टॅरिफ’चा ‘बांबू’ मारताच मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात स्वदेशीची तीच काँग्रेस नीती स्वीकारली, पण काँग्रेसचे नाव न घेण्याचा नेहमीचा कद्रुपणा त्यांनी दाखवलाच. महात्मा गांधी, नेहरू वगैरेंनी स्वतःपासून ‘स्वदेशी’ सुरू केली. मोदी तसे करतील काय?” असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं उपस्थित केला आहे. “स्वतः मोदी व त्यांचे सहकारी विदेशी गाड्यांच्या ताफ्यात फिरतात. स्वदेशी बनावटीच्या ‘मारुती’ गाड्यांचा वापर या सर्व लोकांनी केला पाहिजे. एक तर ‘मारुती’चा संबंध रामभक्त हनुमानाशी व हिंदुत्वाशी आहे. विदेशी गॉगल, विदेशी पेन, विदेशी चपला वगैरे स्वतः वापरायच्या व लाल किल्ल्यावरून जनतेसाठी ‘स्वदेशी’चा नारा द्यायचा. हे ढोंग आहे,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलंय.
