मनिका विश्वकर्मा ने ? Miss Universe India 2025 मध्ये रचला इतिहास !

राजस्थानच्या जयपूर शहरात नुकत्याच पार पडलेल्या ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2025’ स्पर्धेत मनिका विश्वकर्मा हिनं बाजी मारली असून, या ऐतिहासिक विजयामुळे आता ती थायलंडमध्ये होणाऱ्या 74व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. गंगानगरसारख्या छोट्या शहरातून आलेल्या मनिकानं (Manika) सौंदर्य, आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर हे स्वप्न सत्यात उतरवलं आहे.

सौंदर्य आणि आत्मविश्वास
जयपूरमध्ये आयोजित या राष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेत संपूर्ण देशातून आलेल्या 50 स्पर्धकांमध्ये मनिका सर्वाधिक उठून दिसली. तिच्या विजयानंतर टाळ्यांचा गजर झाला. सध्या ती दिल्लीमध्ये राहून मॉडलिंग करते आणि शिक्षण घेत आहे. मिस युनिव्हर्स इंडिया जिंकण्याआधी तिनं ‘मिस युनिव्हर्स राजस्थान 2024’ चा किताबही पटकावला होता.

थायलंडमध्ये करणार भारताचं प्रतिनिधित्व
2025 च्या अखेरीस थायलंडमध्ये होणाऱ्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी आता मनिकाला मिळाली आहे. विजयानंतर तिनं भावनिक भाषणात सांगितलं की, “हा प्रवास सोपा नव्हता, पण माझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवून मी प्रत्येक अडथळा पार केला.” तिनं आपल्या मेंटर्स आणि कुटुंबाचं विशेष आभार मानले. त्यांनी प्रत्येक टप्प्यावर तिला आधार दिला.

मनिकानं आपलं सुरुवातीचं शिक्षण गंगानगरमध्ये पूर्ण केलं आणि पुढील शिक्षणासाठी ती दिल्लीत आली. सध्या ती पॉलिटिकल सायन्स आणि इकॉनॉमिक्स या विषयात पदवी शिक्षण घेत आहे. शिक्षणासोबतच तिनं मॉडलिंग आणि ब्यूटी पेजंट्समध्ये सातत्याने सहभाग घेतला. याचमुळे ती आज या उंचीवर पोहोचली आहे. मनिकाला क्लासिकल डान्स आणि आर्टमध्ये विशेष रस आहे. तिच्या परफॉर्मन्समध्ये याची झलक सातत्याने पाहायला मिळाली. केवळ सौंदर्य नव्हे, तर व्यक्तिमत्त्व आणि सादरीकरणाच्या जोरावर तिनं आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलं.

मनिकाची ही कहाणी केवळ एका ब्यूटी क्वीनची नाही, तर स्वप्न, मेहनत, आणि जिद्दीच्या जोरावर घडलेल्या यशाचं प्रतीक आहे. छोट्या शहरातून येऊन, मोठ्या मंचावर आपली ओळख निर्माण करणाऱ्या मनिकाकडून आता संपूर्ण देशाला आशा आहे की ती थायलंडमध्ये भारताचं तिरंगा अभिमानाने फडकवेल.