ज्या दिवशी एशिया कप (Asia Cup) 2025 साठी भारतीय संघाची घोषणा होणार आहे, त्याच दिवशी टीम इंडियाच्या युवा विकेटकीपर-फलंदाज ईशान किशन जखमी झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आधीच टीम इंडियाच्या प्लॅनबाहेर असलेल्या ईशानसाठी ही अजून एक मोठी अडचण ठरली आहे. विशेष म्हणजे, त्याच्याकडे दलीप ट्रॉफीमध्ये ईस्ट झोनच्या कर्णधारपदाची जबाबदारी होती, तीही आता हातातून निघून गेली आहे.
बाईकवरून पडून दुखापत, हाताला टाके
मिळालेल्या माहितीनुसार, ईशान किशन नुकताच ई-बाईकवरून पडला आहे, ज्यात त्यांच्या हाताला दुखापत झाली. ही गंभीर दुखापत नसली तरी हाताला टाके पडले आहेत आणि सध्या ते बेंगळुरूच्या BCCI सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये रिहॅबमध्ये आहे. बीसीसीआयच्या मेडिकल टीमने त्याला पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
28 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी ईशान किशनला ईस्ट झोनचा कर्णधार नियुक्त करण्यात आलं होतं. मात्र दुखापतीमुळे तो आता क्वार्टर फायनल सामन्यातून बाहेर झाले आहे. त्याच्या जागी बंगालच्या अनुभवी फलंदाज अभिमन्यु ईश्वरनकडे नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. ईश्वरन नुकतेच इंग्लंड दौऱ्यावर टेस्ट संघाचा भाग होता, पण त्यांना एकही सामना खेळायला मिळाला नव्हता. ईशान किशनच्या जागी ओडिशाच्या विकेटकीपर-फलंदाज आशीर्वाद स्वाइन याला स्क्वॉडमध्ये संधी देण्यात आली आहे, तर असमचा अष्टपैलू रियान पराग याला उपकर्णधार बनवण्यात आलं आहे.
ईस्ट झोनला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज आकाशदीप सिंग देखील दुखापतीमुळे बाहेर पडले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट मालिकेत बर्मिंगहॅममध्ये 10 विकेट्स घेणाऱ्या आकाशदीपला कमरेची दुखापत झाली आहे आणि तो अद्याप 100% फिट नाही. त्यांच्या जागी बिहारच्या मुख्तार हुसैन याला संघात स्थान देण्यात आलं आहे. आकाशदीप ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी उपलब्ध असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
