इस्लामपुरात २२ जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन!

सर्वांनाच आता २२ जानेवारीची आतुरता लागली आहे. श्री राम जन्मभूमी अयोध्येत होणाऱ्या रामलल्लांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हाभरात विविध उपक्रम होणार असून यामध्ये सर्व स्तरातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. श्री. पाटील म्हणाले, इस्लामपूर शहरात १ ते १५ जानेवारी दरम्यान भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत.

श्री राम मूर्तीची शोभायात्रा व घरोघरी अयोध्येहून आलेल्या अक्षतांचे वाटप होईल. १४ ते २० जानेवारी दरम्यान वाकोबा मंदिरात गीत रामायण, कलश पूजन व आरती होईल. २२ जानेवारी रोजी यल्लम्मा चौकात मंदिराच्या समोर १० ते १ या वेळेत प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण, शहरातील ४१ समाजातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक व कारसेवकांच्या हस्ते औक्षण व महाआरती होईल. यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे. संध्याकाळी मंदिरात दीपोत्सव असा कार्यक्रम चालणार आहे.