भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री

बॉलिवूडमधील कलाकारांचे मानधन हा कायम चर्चेचा विषय असतो. बहुतांश वेळा बॉलिवूडमधील कलाकार मंडळी आपलं मानधन समोर येऊन देत नाही. स्वत:चं मानधन जाहीरपणे समोर आणत नाहीत. मात्र काही वेळा त्यांच्या मानधनाची माहिती बातम्यांमधून समोर येते किंवा त्यावर अफवा पसरवल्या जातात. सध्याच्या घडीला पुरुष कलाकार एका चित्रपटासाठी 100 कोटींपेक्षा जास्त रक्कम घेताना दिसतात, तर अभिनेत्री(actress) देखील यात मागे नाहीत. भारतात एका चित्रपटासाठी तब्बल 30 कोटी रुपये घेणारी म्हणजेच सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आहे. विशेष म्हणजे, गेल्या सहा वर्षांत तिचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही.

प्रियांका चोप्रा तब्बल सहा वर्षांनंतर एस.एस. राजामौली यांच्या आगामी चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. या चित्रपटात महेश बाबू मुख्य भूमिकेत आहे. जवळपास 20 वर्षांनंतर प्रियांका पुन्हा एका दक्षिणेच्या चित्रपटात दिसणार आहे. बॉलीवूड हंगामा या वेबसाईटनुसार, या प्रकल्पासाठी प्रियांकाने तब्बल 30 कोटी रुपये घेतले आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीत एखाद्या अभिनेत्रीला दिले गेलेले हे सर्वात मोठे मानधन मानले जात आहे. तथापि, एवढ्या मोठ्या रकमेसाठी चर्चा करताना प्रियांकाचा निर्णय अंतिम होण्यासाठी बराच वेळ लागला. तिने तिच्या सांगितलेल्या रकमेत कोणतीही कपात केली नाही. त्यावर अनेक अभिनेत्रींचा प्रश्न असतो – आम्ही आमचं मानधन का कमी करावं? आमच्या कामाला पुरुष कलाकारांइतकाच सन्मान मिळायला नको का?

प्रियांकाचे आधीचे मानधन
यापूर्वी प्रियांकाने अॅमेझॉन प्राइमवरील सिटाडेल या शोसाठी 5 दशलक्ष डॉलर्स (41 कोटींपेक्षा अधिक) मानधन घेतले होते. तो शो सहा तासांचा असल्यामुळे त्याचीही खूप चर्चा झाली होती. मात्र SSMB29 या चित्रपटासाठी प्रियांकाने घेतलेले 30 कोटी हे भारतीय चित्रपटसृष्टीत कोणत्याही अभिनेत्रीने(actress)घेतलेले सर्वाधिक मानधन मानले जात आहे.

भारतीय चित्रपटात प्रियांकाचे पुनरागमन
प्रियांकाने 2015 मध्ये हॉलिवूडकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ती भारतीय चित्रपटांमध्ये फारशी दिसली नाही. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या जय गंगाजल नंतर ती फक्त एकदाच द स्काय इज पिंक (2019) मध्ये दिसली. आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबतचा तिचा ऑल वुमन रोड ट्रिप हा चित्रपट मात्र अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला गेला. त्यामुळे गेल्या सहा वर्षांत प्रियांकाचा एकही भारतीय चित्रपट थिएटर किंवा ओटीटीवर झळकलेला नाही.