भारताच्या नंदनवनात पुराचं थैमान

अतिमुसळधार पाऊस आणि त्यामुळं आलेल्या पुरादरम्यान जम्मू काश्मीरमध्ये नद्यांनीसुद्धा रौद्र रुप धारण केलं असून, नदीपात्रातून वाहणारं पाणी प्रचंड ताकदीनं वाहत असल्या कारणानं इथं अनेक गावांना पुराचा धोका असल्याचं सांगण्यात येत आहे. निसर्गाचा कोप झालेल्या या भागामध्ये वैष्णोदेवी इथं झालेल्या भूस्खलनामध्ये अनेकांनीच जीव गमावला असून, अद्यापही काहीजण ढिगाऱ्याखाली अकडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

किश्तवाडमध्ये झालेल्या ढगफुटीनंतर जम्मू काश्मीरमधीय डोडा आणि वैष्णोदेवी भागामध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीनं अनेकांचा थरकाप उडवला. या संकटानं अनेक भाविकांचा मृत्यू ओढावला ज्यामध्ये सर्वाधिक मृत उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, पंजाबमधील राहणारे होते असं सांगण्यात येतं. दरम्यान या पूरस्थितीवर भाष्य करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला जिथं तावी नदीपात्रानं रौद्र रुप धारण केल्याचं पाहायला मिळालं. पाण्याची इतकी प्रचंड ताकद पाहून अनेकांचाच थरकाप उडाला.

जम्मू काश्मीरच्या (Jammu and Kashmir) बहुतांश भागांमध्ये सध्याच्या घडीला मोबाईल नेटवर्क आणि वीजपुरवठा खंडित असल्या कारणानं नागरिकांना आणि तिथं अडकलेल्या पर्यटकांना आव्हानांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान या भागातील एकंदर हवामान स्थिती पाहता आगामी दिवसांमध्ये जम्मू काश्मीरच्या दिशेनं जाणाऱ्यांनी आपले बेत परिस्थितीचा आढावा घेऊन आखावेत किंवा रद्द करावेत असा सावधगिरीचा इशारासुद्धा देण्यात येत आहे.

जम्मू काश्मीरमधील तवी, चिनाब, उझ, रावी आणि बसंतरसह सर्व नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत असून, दरम्यानच्या काळात उधमपूरमध्ये 369.4 मिलीमीटर पाऊस झाला. आतापर्यंत उपलब्ध अधिकृत आकडेवारीनुसार जम्मूच्या पूरग्रस्त भागातून 90 जणांना वाचवण्यात आलं. इथं देशाच्या वायुदलानं बचाव आणि मदत कार्यामध्ये मोठी मदत करत जम्मूच्या पूरग्रस्त भागात एमआय-17 आणि चिनूत हेलिकॉप्टर तैनात केले. या दोन विमानांनी एकत्रितपणे 124 कर्मचारी, 22 टन साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवले. तर, संपर्क तुटलेल्या भागांत पिण्याचे पाणी, अन्नाची पाकिटे पुरवण्यासही सुरुवात केली.