जरांगे हजारो समर्थकांसहीत आज पुणेमार्गे मुंबईत… अनेक रस्ते बंद

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी समाजबांधव मोर्चा काढणार असून हा मोर्चा आज पुणे जिल्ह्यातील काही भागांतून जाणार आहे. त्यामुळे या भागात वाहतूककोंडी होऊ नये. तसेच कायदा व सुव्यसस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी शुक्रवारपर्यंत (दि.29) पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचे आदेश जारी केले आहेत.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील हा मोर्चा पुणे जिल्ह्यातून गुरुवारी किल्ले शिवनेरीवरून नारायणगावमार्गे मंचर-खेड-चाकण-तळेगाव ते लोणावळ्यावरुन वाशी, चेंबूरमधून मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानाकडे जाणार आहे. जरांगेंसोबत असलेल्या मराठा समाजबांधवांची गर्दी होणार असल्याने नगर-कल्याण मार्गावरील वाहतूक 14 नंबर जांबूत फाटा येथून नगरकडे जाणारी वाहतूक बोर-बेल्हे-अळकुटी-पारनेर अहिल्यानगरमार्गे वळविली जाणार आहे.

नारायणगावकडून जुन्नरकडे जाणारी व्हातून आळेफाटा-कारखाना शिरारक बुदेकर मार्ग वळविण्यात आली आहे. तर नारायणगावकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुणे-नाशिक महामार्ग क्र. 50 व बायपास महामार्ग यावरील नारायणगावकडून चाकणकडे जाणारी वाहतूक नारायणगाव बायपासमार्गे कारफाटा-मंजर पोलिस स्टेशन-नागापूर रोडेवाडी फाटा ते लोणी-पाबळ मार्गे शिक्रापूर-नगर रोडमार्गे पुणे अशी वळविण्यात आली आहे.

नारायणगावकडून येताना बायपास क्र. 60 मार्गे मंचर ते निघोटवाडी सरळमार्गे मोर्चा जाताना जीवन खिंड-मंचर शहर-अवसरी फाटा ते जीवन खिंड-नंदी चौक अशी वळविण्यात आली आहे. खेड शहराकडून पुण्याकडे जाणारी वाहने पाबळमार्गे जातील. जुन्या पुणे-मुंबई महामार्ग क्र. 48 वरील वाहतूक नवीन पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वळविण्यात आली असून, चाकण-देहूरोडकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक वडगाव फाट्यावरुन द्रुतगती मार्गावरून उर्से टोलनाकामार्गे मुंबईकडे वळविण्यात येईल.

मुंबई ते पुणे द्रुतगती मार्गावरुन मुंबईकडे जाणारी सर्व वाहने वलवण एक्झिटवरून लोणावळा शहरात न वळविता मुंबईकडे जातील. जुना मुंबई ते पुणे मार्गावरून पुण्याकडे जाणारी सर्व वाहने खंडाळा-वलवण एक्झिटवरून लोणावळा शहरात अथवा जुन्या महामार्गावर न वळविता पुण्याकडे जातील.