जळगाव हादरलं ! माजी नगरसेवकावर कोयत्याने हल्ला; तीन आरोपी अटकेत

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात नुकताच माजी नगरसेवकावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याने एकच खळबळ उडाली होती. 26 ऑगस्ट रोजी माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर काही अज्ञात इसमांनी कोयत्याने वार करत त्यांना गंभीर जखमी केले होते. या घटनेनंतर शहरात मोठी दहशत पसरली होती. अखेर पोलिसांनी या हल्ला प्रकरणातील तिघा आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे.

शहर पोलिसांनी प्रमुख आरोपी सोमा उर्फ सागर चौधरी, हरीश उर्फ सनी पाटील आणि गौरव उर्फ सोनू चौधरी या तिघांना चाळीसगाव शहरातूनच सापळा रचून अटक केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांत दिलासा मिळाला आहे. आरोपींनी नगरसेवकावर केलेला हल्ला अत्यंत थरारक होता. कोयत्याच्या प्रहारांमुळे प्रभाकर चौधरी गंभीर जखमी झाले होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या हल्ल्यानंतर शहरात निर्माण झालेली भीती आणि आरोपींची दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी विशेष पाऊल उचलले. तिन्ही आरोपींची पायी धिंड काढण्यात आली. यामुळे नागरिकांच्या मनात निर्माण झालेली भीती काही प्रमाणात कमी झाली आहे. अटक केलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या तिन्ही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या काळात पोलिस आरोपींकडून अधिक माहिती घेऊन हल्ल्याच्या मागचे कारण, त्यामागील इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास करतील.