मराठा समाजाने आरक्षणासंदर्भात केलेल्या आठपैकी सहा मागण्या राज्य सरकारने मान्य करत त्यासंदर्भात शासन आदेशही जारी केले आहेत. या निर्णयामुळे पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेत समाधान व्यक्त केलं आहे. मंगळवारी सायंकाळी राज्यभरातील वेगवेगळ्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासंदर्भातील सहा महत्त्वाच्या मागण्या मान्य करण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन सेलिब्रेशन मराठा बांधवांनी केलं. मात्र या जीआरला आता ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी तर या जीआरविरोधात न्यायालयात जाण्यासंदर्भात विधान केलं आहे. असं असतानाच या पुढील संभाव्य न्यायालयीन लढाईबद्दल जरांगेंनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत भाष्य केलं.
मराठा आरक्षणाविरोधात याचिका कारणाऱ्या विनोद पाटील यांच्यासहीत मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना जरांगेंनी टोला लगावला. “काहींचं पोट दुखतं त्यांना राजकारण करायचं होतं. हे लोक कधीच आपल्या बाजूने बोललेले नाहीत,” असं जरांगे म्हणाले. “सरकारने काढलेल्या जीआरमध्ये काही कमी असेल तर सरकारकडून सुधारीत जीआर काढण्याचा शब्द घेतला आहे. कुणीही नाराज होऊ नये. वकील, तज्ज्ञांच्या सल्ल्याने जीआर हातात घेतला आहे,” असं जरांगेंनी समर्थकांना सांगितलं.
मराठा आरक्षणासंदर्भात याचिका दाखल करण्यात आल्याने जीआर रद्द झाल्यावर शासनाने केलेल्या तरतुदी रद्द होणार का? यासंदर्भात काही समाज बांधवांमध्ये संभ्रम आहे. मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआरवर हरकत घेणारी याचिका दाखल करण्यात आल्यासंदर्भात जरांगेंना आज पत्रकारपरिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना जरांगेंनी, “निर्भीड राहा. गेले मराठे आरक्षणात. झाले सरसकट आरक्षित. सगे सोयऱ्याच्या अध्यादेशावर अभ्यास सुरू झाला आहे. सगे सोयरे अंमलबजावणी पाहिजे अशी मागणी मी केली आहे. फालतू 2-4 अभ्यासकांचे डोके खराब झाले आहे,” असं उत्तर दिलं.
“मी सगे-सोयरे पण सोडणार नाही. मराठा कुणबी एकच आहे हे पण सोडणार नाही,” असा शब्द जरांगेंनी समर्थकांना दिला. “कितीही याचिका दाखल केल्या तरी चॅलेंज होणार नाही. सरकारी नोंदी असतील सरकारी दस्तावेज धुडकावून लावता येत नाही. दस्तावेज नाकारता येत नाही. मराठ्यांनी आता जास्त आनंदात राहावे. समाजाचे वाटोळे करणाऱ्यांना लोटावे लागणार,” असं आवाहन जरांगेंनी समाजाला केलं आहे.
