भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड च्या अध्यक्षपदावर मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रोजर बिन्नी यांचा कार्यकाळ संपल्यामुळे पुढचा अध्यक्ष कोण होणार याबद्दल चर्चांना उधाण आलं आहे. सप्टेंबरच्या अखेरीस होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षासह इतर महत्त्वाच्या पदांसाठी निवडणूक पार पडणार आहे.
नियमांनुसार वयोमर्यादा पूर्ण झाल्याने रोजर बिन्नींना पद सोडावं लागलं. ते ७० वर्षांचे झाले आहेत. त्यांच्या जागी तात्पुरते उपाध्यक्ष राजीव शुक्ला कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. यापूर्वीही गांगुली, जय शाह युगानंतर बिन्नींनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती.
जागरणच्या अहवालानुसार, विक्रम मोडणाऱ्या आणि घडवणाऱ्या एका प्रतिष्ठित क्रिकेटरचं नाव अध्यक्षपदासाठी पुढे सरकवलं जात आहे. इंग्लंडमध्ये या संदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र त्या खेळाडूने अद्याप औपचारिक संमती दिली आहे की नाही, हे स्पष्ट झालेलं नाही. महत्त्वाच्या हितधारकांना वाटतं की असा प्रतिष्ठित क्रिकेटर अध्यक्ष बनल्यास बोर्डची प्रतिमा अधिक मजबूत होईल.
रिपोर्टनुसार, यावेळी देखील बीसीसीआयच्या पदांवर निवडणूक न होता, परस्पर सहमतीने नियुक्त्या होण्याची शक्यता आहे. मागील दोन कार्यकाळात जसं झालं तसंच ‘मोठे लोक’ अंतिम निर्णय घेतील, असं सूत्रांचं म्हणणं आहे.
इतर पदांसाठीही चर्चेला वेग
सचिव देवजीत सैकिया आपल्या पदावर कायम राहू शकतात.
आयपीएल चेअरमन पदासाठी संजय नाईक आणि राजीव शुक्ला यांच्या नावांची चर्चा आहे.
कोषाध्यक्ष प्रभतेज भाटिया आणि संयुक्त सचिव रोहन गौंस देसाई यांनाही पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.
