मुंबईतील ‘त्या ‘ चौकाला जरांगेचं नाव ? थेट CM फडणवीसांपर्यंत पोहचला विषय

ऐन गणेशोत्सवामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत धडक देणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणासंदर्भातील आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. आरक्षणासंदर्भात केलेल्या आठपैकी सहा मागण्या मान्य करत राज्य सरकारने थेट शासन आदेश जारी केल्याने महाराष्ट्रातील मराठा समाजाने जागोजागी आनंद व्यक्त केला. मुंबईच्या मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस , मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोरील चौकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आझाद मैदानामध्ये जरांगेंसहीत हजारो आंदोलक पाच दिवस ठाण मांडून होते. यामुळे दक्षिण मुंबईतील दैनंदिन व्यवहार आणि कारभार पूर्णपणे कोलमडल्याचं पाहायला मिळालं. अखेर पाचव्या दिवशी या वादावर शासन आदेशाच्या माध्यमातून तोडगा निघाला आणि मराठ्यांनी एकच जल्लोष केला. हा निर्णय मराठ्यांबरोबरच राज्यातील राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. मात्र आता या निर्णयानंतर मुंबईतील एका ऐतिहासिक चौकाचं नाव बदलण्यासंदर्भातील चर्चा सुरु झाली आहे.

लाखो मुंबईकर दररोज सीएसएमटीच्या परिसरातून प्रवास करतात. या चौकाचं महत्त्व पाहता त्याचं नामकरण जरांगेंच्या नावाने करण्याची मागणी करण्यात आली आहे. या चौकाला मनोज जरांगे पाटील यांचे नाव दिल्यास मराठा, शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि बहुजन समाजातील तरुणांना प्रेरणा मिळेल, असे समितीनं निवेदनात म्हटलं आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने तातडीने चौकाचे नामकरण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर राहुल पाटील ढोले, महेशभाई गुजर, अण्णासाहेब जाधव, योगेश पाटेकर, सार्थक पाटेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

साधारण दोन वर्षांपूर्वी मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून आंतरवाली सराटीमध्ये आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी पाच दिवस अन्नाचा कणही न घेता आझाद मैदानावर उपोषण केलं. त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्यानंतर मराठा आंदोलक आणि जरांगे पुन्हा आपल्या गावी परतले. मात्र आता जरांगेंनी मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईच्या केंद्रस्थानी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरील चौकाला जरांगेंचं नाव देण्याची मागणी केली जात आहे. मुंबईतील या ऐतिहासिक चौकाला ‘संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील’ असे नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे.