कॅन्सरशी झुंज देणारी मराठमोळी अभिनेत्री प्रिया मराठेचं काही दिवसांपूर्वीच आकस्मिक निधन झालं. प्रियाच्या जाण्याने अनेकांना मोठा धक्का बसला. प्रियाच्या मृत्यूचा धक्का ताजा असतानाच आता आणखी एका मराठी अभिनेत्याचा अशाच पद्धतीने आकस्मिक मृत्य़ू झाल्याची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्याने बॉलिवूडमधील खिलाडी अक्षय कुमार आणि रणवीर सिंग यांच्यासारख्या नावाजलेल्या अभिनेत्यांसोबतही स्क्रीन शेअर केली होती. वयाच्या 55 व्या वर्षी या अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला.
बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये लक्षात राहतील अशा भूमिकांमध्ये दिसलेला अभिनेता आशिष वारंग याचे शुक्रवारी आकस्मिक निधन झाले. वयाच्या 55 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र मागील काही काळापासून ते प्रकृतीसंदर्भातील समस्यांना तोंड देत होते. त्याच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना आणि हितचिंतकांना धक्का बसला आहे.
आशिषने अजय देवगण, अक्षय कुमार आणि रणवीर सिंगबरोबर ‘सूर्यवंशी’ चित्रपटात काम केलेलं आहे. तसेच अभिनेता अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेल्या ‘दृश्यम’मध्येही तो झळकला होता. इतर अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्येही काम केलेलं आहे. ‘एक व्हिलन रिटर्न्स’मध्येही आशिषने काम केलं होतं. प्रसिद्ध वेब सीरिज ‘द फॅमिली मॅन’मध्येही आशिषने काम केलेलं. ‘बॉम्बे’ या अॅक्शन ड्रामा चित्रपटात त्याने अखेरची भूमिका साकारली होती.
अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये अगदी छोट्या भूमिका साकारण्याची संधी मिळाल्यानंतरही आशिषने त्या संधीचं सोनं केलं. त्याने त्याच्या अभिनयाचा ठसा चाहत्यांच्या मनावर उमटवला. अक्षय कुमार, रणवीर सिंग, आमिर खान, करीना कपूर, अमिताभ बच्चन, राणी मुखर्जी आणि इतर अनेक कलाकारांसोबत आशिषने वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आशिषचा भाऊ अभिजीत वारंगने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत या बातमीला दुजोरा दिला आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
