महाराष्ट्राच्या राजकारणात विधानसभेसोबतच आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावरून महाविकास आघाडीत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ २९ ऑगस्ट रोजी संपला. त्यानतंर हे पद रिक्त झाले होते. आता या रिक्त झालेल्या पदावर काँग्रेसने दावा केला आहे. ज्येष्ठ नेते सतेज पाटील यांची या पदावर नियुक्ती केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या महाराष्ट्र विधान परिषदेतील पक्षीय बलाबल पाहता काँग्रेसकडे सर्वाधिक ८ सदस्य आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाकडे ६ आमदार आहेत. विरोधी पक्षांमध्ये काँग्रेसचे सदस्य जास्त असल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर आपला हक्क आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी झालेल्या महाविकास आघाडीच्या एका बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांनी याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली होती. विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे देण्यास आमची कोणतीही हरकत नाही. पण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसलाच मिळायला हवे, असे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी म्हटले होते.
सध्या महाराष्ट्राच्या विधिमंडळात विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच अशी स्थिती निर्माण झाली आहे. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने आधीच दावा सांगितला आहे. त्यानंतर आता विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसने दावा केला आहे. त्यामुळे आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
