भारतीय संघ आशिया कप 2025 च्या तयारीत व्यस्त असून 8 सप्टेंबर रोजी तिसरे सराव सत्र पार पडले. मात्र या सराव सत्रातून संजू सॅमसनसाठी फारसे सकारात्मक संकेत मिळाले नाहीत. फलंदाजीतून संघाच्या अंतिम अकराचे संकेत मिळत असल्याचे पाहायला मिळाले, ज्यात सॅमसनचा समावेश होईल का नाही, यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
संजू सॅमसन सरावाला सर्वात आधी पोहोचला आणि त्याने कीपिंग प्रॅक्टिसने सुरुवात केली. विकेटकीपिंगदरम्यान त्याचे झेल उत्तम होते आणि त्याच्या चांगल्या प्रयत्नांना बाकीच्या सोबतच्या सहकारी खेळाडूंनी दाद दिली. मात्र जेव्हा फलंदाजीचा सराव सुरू झाला तेव्हा सॅमसन नेट्सपासून दूरच राहिला. याच दरम्यान, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर त्याच्याकडे गेले आणि जवळपास तीन मिनिटे त्याच्याशी चर्चा केली. गंभीर सतत बोलत होते, तर सॅमसन लक्षपूर्वक ऐकत होता. त्यामुळे गंभीर त्याला फलंदाजीसंदर्भात मार्गदर्शन करत असल्याचा अंदाज वर्तवला गेला.
नेट्समध्ये जितेश शर्मा, शिवम दुबे, तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या यांनी सुरुवातीला फलंदाजी केली. त्यानंतर शुभमन गिल, सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मालाही दोन-तीनदा बॅटिंगची संधी देण्यात आली. मात्र, संजू सॅमसनला पूर्ण कालावधीत एकदाही बोलावण्यात आले नाही. तो कधी नेट्सजवळ येत होता, तर कधी आइस बॉक्सजवळ शांतपणे बसलेला दिसत होता.
सरावाच्या शेवटी अखेर त्याला नेट्समध्ये संधी मिळाली. एका नेट बॉलरने टाकलेल्या शॉर्ट पिच चेंडूवर तो शॉट खेळताना चुकला. यानंतर तो पुन्हा शांतपणे बाहेर गेला. या संपूर्ण घडामोडींमुळे एशिया कप 2025 साठी संजू सॅमसनला अंतिम अकरात स्थान मिळेल का नाही, याबद्दल मोठी चर्चा रंगू लागली आहे.
