लेक एक वर्षाची होताच, दीपिकानं बर्थडे पार्टीसाठी निवडला खास पर्याय

बॉलिवूडमध्ये अतिशय कमी वेळात प्रसिद्धीझोतात आलेल्या आणि दीर्घकाळ ही प्रसिद्धी टीकवून ठेवणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे दीपिका पादुकोण. साचेबद्ध विचारसरणीला शह देत दीपिकानं कायमच कलाजगतामध्ये तिचं वेगळेपण सिद्ध केलं. अशी ही अभिनेत्री सध्या तिच्या मातृत्त्वाच्या प्रवासाचा आनंद घेत आहे.

वर्षभरापूर्वीच दीपिकानं एका गोंडस मुलीला जन्म दिला. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या नात्याचा त्रिकोण पूर्ण करणाऱ्या या परिला त्यांनी ‘दुआ’ असं नाव दिलं. हीच लाडाची लेक आता एक वर्षाची झाल्याचा आनंद दीपिकानं खास मार्गानं साजरा केला आणि यामध्ये चाहत्यांनाही सहभागी करून घेतलं.

कसा साजरा झाला दीपिका- रणवीरच्या मुलीचा पहिला वाढदिवस?

आता दीपिका आणि रणवीर ही लोकप्रिय सेलिब्रिटी जोडी म्हटलं तर त्यांचं सेलिब्रेशनही ग्रँड असेल, असंच अनेकांतं मत. मात्र इथं या जोडीनं काहीसा वेगळा पर्याय निवडल्याचं पाहायला मिळतं. किमान दीपिकानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेला फोटो पाहून तरी त्यांनी कोणतीही मोठी पार्टी वगैरे केली नसून, घरातच या चिमुकलीचा वाढदिवस 8 सप्टेंबरला कुटुंबीयांच्या सानिध्ध्यात साजरा केल्याचं पाहायला मिळत आहे.

दीपिकानं तिच्याच इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एका केकचा फोटो शेअर केला. प्रथमदर्शनी तो एक ‘रिच चॉकलेट केक’ असल्याचं पाहायला मिळत असून, या फोटोसोबत तिनं कॅप्शन लिहिलं, ‘प्रेम व्यक्त करण्याची माझी भाषा? लेकीच्या पहिल्या वाढदिवसासाठी केक बेक करणं.’ दीपिकानं हा फोटो शेअर करताच त्यावर चाहत्यांनी अनेक कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला. सेलिब्रिटी असतानाही मुलगी अतिशय लहान असल्यानं कुटुंबीयांसमवेतच वाढदिवस साजरा करण्याचा दीपिकाचा हा निर्णय अनेकांना भावला असून, चाहत्यांनीसुद्धा तिच्या या निर्णयासह प्रेम व्यक्त करण्याच्या या भाषेचंही कौतुक केलं.