अभिनेते किरण मानेंविरोधात ABVP-भाजप कार्यकर्ते आक्रमक

अभिनेते किरण माने सामाजिक, राजकीय विषयांवर स्पष्ट आणि थेट भूमिका मांडत असतात. दरम्यान अभिनेता किरण माने यांच्या फेसबुक पोस्टवरून नाशिकमध्ये वादंग निर्माण झाला आहे. भाजप आणि ABVP आक्रमक झाले असून सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नेपाळ मध्ये तरुणांनी केलेल्या उठावाच्या पार्श्वभूमीवर अभिनेता किरण माने यांनी फेसबुकवर भारतातही युवकांनी उठाव करण्याची चिथावणीखोर पोस्ट टाकल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. त्यामुळे चिडलेल्या ABVP कार्यकर्त्यांनी एकत्र येत प्रसिद्ध अभिनेता किरण माने यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. तसेच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत मानेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीये.

ABVP चा आरोप आहे की, मानेंची फेसबुक पोस्ट नेपाळ संदर्भातून भारतातील लोकशाही व्यवस्थेविरोधात उठाव करण्यास प्रवृत्त करणारी आहे. त्यामुळे सायबर पोलिसांनी देशविरोधी घटक कारवाया करण्याप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल करण्याची मागणी केलीय. याबाबत प्राथमिक चौकशी करत कारवाईला सुरुवात केलीय.

याप्रकरणी भाजपनेही आक्रमक भूमिका घेतली असून मानेंना अटक करण्याची मागणी केली आहे. नाशिकमध्ये या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले आहे. किरण माने यांच्या पोस्टवरून निर्माण झालेल्या या वादळानंतर आता पोलीस नक्की काय पावलं उचलतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.