आशिया कपच्या धामधुमीत एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह बीसीसीआयमध्ये महत्त्वाच्या पदावर विराजमान होऊ शकतो, अशी जोरदार चर्चा रंगली आहे. 28 सप्टेंबरला बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असून, त्यावेळी अध्यक्षांसह इतर अनेक महत्त्वाच्या पदांची घोषणा केली जाणार आहे. त्याआधी पंजाब क्रिकेट असोसिएशनने हरभजन सिंह यांना आपला अधिकृत प्रतिनिधी म्हणून पुढे केले आहे.
हरभजन याआधी पंजाब क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार म्हणून काम पाहिलेले आहेत. पण आता जर त्यांना प्रतिनिधी म्हणून संधी मिळाली, तर पहिल्यांदाच ते राज्य संघटनेतून अधिकृत प्रतिनिधित्व करणार आहेत. बीसीसीआयने सर्व राज्य संघटनांना आपापले प्रतिनिधी 12 सप्टेंबरपर्यंत कळवण्याचे निर्देश दिले होते.
बीसीसीआय निवडणुकीसाठी अर्ज करण्याची मुदतदेखील एक दिवसांनी वाढवण्यात आली आहे. सुरुवातीची अंतिम तारीख 20 सप्टेंबर होती, ती आता 21 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. तसेच, अर्ज मागे घेण्यासाठी 23 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. 28 सप्टेंबरला निवडणूक होणार असून, त्याच दिवशी एशिया कपची अंतिम लढतही खेळली जाणार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संयुक्त सचिव आणि कोषाध्यक्ष या पदांसाठी नियुक्त्या होतील.
याचदरम्यान, बीसीसीआय अध्यक्षपदासाठी सचिन तेंडुलकर यांच्या नावाची चर्चा रंगली होती. मात्र, त्यांच्याच कंपनीने या चर्चेला पूर्णविराम देत स्पष्ट केले की, “सचिन तेंडुलकर अध्यक्ष होणार असल्याच्या बातम्या निराधार आहेत. यामध्ये अजिबात तथ्य नाही. अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.” थोडक्यात,आशिया कपच्या तापलेल्या वातावरणात बीसीसीआयच्या वार्षिक बैठकीकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे. विशेषत: हरभजन सिंह यांना पद मिळणार का, याकडे क्रीडाविश्वाचे डोळे लागले आहेत.
