बंजारा समाजाला ST आरक्षण द्या, सुसाईड नोट लिहून तरुणाची आत्महत्या

मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर त्याच गॅझेटप्रमाणे बंजारा समाजाला अनुसूचित जमातींमधून आरक्षण द्या अशी मागणी होत आहे. या मागणीसाठी धाराशिवमधील मुरुम गावच्या युवकाने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. पवन गोपीचंद चव्हाण असं 32 वर्षीय युवकाने नाव असून तो पदवीधर बेरोजगार आहे. मयत तरुणाच्या पाश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुलं असं कुटुंब आहे.

बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेट प्रमाणे आरक्षण मिळावे असा आशयाची सुसाईड नोट मयत युवकाने लिहून ठेवली आहे. पवनने बंजारा आरक्षणासाठी पवनने आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा दावा आहे. जालना येथील बंजारा आरक्षण आंदोलनातून परतल्यानंतर त्याने हे दुर्दैवी पाऊल उचलले.

मुरूम येथून जवळच असलेल्या नाईक नगर येथील पदवीधर युवक पवन गोपींचद चव्हाण याने शनिवारी, सकाळी अकरा वाजता राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्याने जिंतूर येथे गोर सेना अध्यक्ष संदेश पवार यांच्या नेतृत्वात चालू असलेल्या आंदोलनात दोन दिवस जाऊन सहभाग घेतला होता. त्यानंतर शुक्रवारी तो नाईक नगर येथे आला होता.

आपल्या मित्रांमध्ये पवन चव्हाण या आरक्षाणाविषयी जनजागृती करत होता. शनिवारी सकाळी उठून तो जिंतूर येथे जाण्यासाठी तयारी करीत असतानाच अचानकपणे त्यांनी आपल्या राहत्या घरातील बांबूला गळफास घेत आत्महत्या केल्याचे दिसून आले. पोलिसांना याची माहिती मिळाली असता तात्काळ पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संदीपान दहिफळे यांनी घटना स्थळी धाव घेतली.

पोलिसांना मयताच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. हैद्राबाद गॅझेट प्रमाणे बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्यात यावे अशी मागणीचे पत्र त्याने लिहून ठेवल्याचे आढळले. मयत पवन गोपींचद चव्हाणने लातूर येथील शाहू कॉलेज मध्ये बी कॉम पदवी शिक्षण घेतले असल्याचे सांगण्यात येत आहेत. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बायको,व एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.