शुभमन गिलची दुखापत किती गंभीर? आज पाकिस्तान विरुद्ध खेळणार की नाही?

आशिया कप 2025 मध्ये (Asia Cup) सहावा सामना रविवार 14 सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान (India VS Pakistan) यांच्यात पार पडणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी आणि रोहित, विराट या दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीनंतर पहिल्यांदाच टीम इंडिया मैदानात पाकिस्तानचा सामना करणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी शनिवारी सराव करत असताना टीम इंडियाचा उपकर्णधार शुभमन गिलला दुखापत झाली. गिल हा भारताचा सलामी फलंदाज सुद्धा आहे, त्यामुळे संघाची चिंता वाढली असून तो रविवारी पाकिस्तान विरुद्ध सामना खेळणार की नाही याविषयी शंका उपस्थित करण्यात आली होती. आता गिलच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर आलीये.

गिलची दुखापत किती जास्त ?
चांगल्या फॉर्ममध्ये असणाऱ्या शुभमन गिलला (Shubman Gill)सराव सुरु असताना दुखापत झाली. शनिवारी सराव करताना त्याला दुखापत झाली आणि फिजिओ त्यांना मदत करण्यासाठी धावले, गिलला मैदानाच्या बाहेर नेण्यात आलं. गिलच्या हाताला दुखापत झाली होती आणि वेदनेने तो विव्हळत होता. अशातच त्याला मैदानाबाहेर एका बॉक्सवर बसवण्यात आलं. यावेळी कर्णधार सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीर हे दोघे गिलजवळ आले. त्याच्यासोबत संघातील सहकारी अभिषेक शर्मा होता आणि त्याने त्याला पाण्याची बाटली उघडण्यासही मदत केली. सराव सत्रादरम्यान फिजिओने गिलवर सतत लक्ष ठेवले.

शुभमन गिलच्या (Shubman Gill)दुखापतीशी संबंधित गिलला जास्त वेदना होत नाहीत. सराव दरम्यान चेंडू त्याच्या हातावर हलका आदळला ज्यामुळे त्याला किरकोळ दुखापत झाली. दुखापतीच्या काही वेळानंतर शुभमन गिल पुन्हा मैदानात सरावासाठी आला होता. त्यामुळे पाकिस्तान विरुद्ध सामन्यात तो सलामी फलंदाजीसाठी उतरू शकतो.

दोन्ही संघांसाठी महत्वाचा सामना :
14 सप्टेंबर रोजी होणारा सामान हा भारत – पाकिस्तान या दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. याचं कारण म्हणजे भारताने 10 सप्टेंबर रोजी यूएई विरुद्ध सामना खेळला यात त्यांनी 9 विकेटने विजय मिळवला. तर पाकिस्तानने ओमानवर 93 धावांनी विजय मिळवला. भारत पाकिस्तान संघ एकाच ग्रुपमध्ये असून सध्या त्या दोघांचेही एक – एक पॉईंट्स झाले आहेत. आता जो संघ रविवारचा सामना जिंकेल त्यांचे सुपर 4 मध्ये पोहोचण्याचे चान्सेस वाढतील.