पुन्हा भारत-पाकिस्तान मॅच पुन्हा कधी ?

आशिया कप 2025 च्या पहिल्या फेरीत झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली. आशिया कप 2025 संयुक्त अरब अमिरातीमध्ये 9 ते 28 सप्टेंबर २ दरम्यान खेळवला जाणार आहे. ही स्पर्धा 2026 टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी महत्त्वाची आहे. यात 8 टीम सहभागी असून, दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत. टीम इंडियाने 2023 मध्ये ही ट्रॉफी जिंकली असल्याने ते प्रबळ दावेदार आहेत. तर पाकिस्तानही मजबूत आव्हान देऊ शकतो. टीम इंडिया आणि पाकिस्तानच्या मॅचला देशभरातून विरोध झाला. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा सामना होऊ नये अशी भूमिका भारतातील विविध स्तरातून व्यक्त केली जात होती. तरी ही मॅच पार पडली ज्यात टीम इंडियानं विजय मिळवला. आशिया कपमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान आणखी कितीवेळा एकत्र येणार ? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. याचे उत्तर जाणून घेऊया.

आशिया कप 2025 मध्ये ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तान, ओमान आणि युनायटेड अरब अमिराती यांचा समावेश आहे. भारताने पहिल्या सामन्यात यूएईचा पराभव केला, तर पाकिस्तानने ओमानला हरवले. ग्रुप बी मध्ये श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग आहेत. प्रत्येक संघ तीन सामने खेळेल, ज्यात भारत-पाकिस्तान भिडत असलेला एक सामना आहे.

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर विजय मिळवला. हा ग्रुप ए मधील सामना असून यामुळे टीम इंडियाला गुण मिळाले. इतर 2 टीम (ओमान आणि यूएई) कमकुवत असल्याने, या सामन्याचा निकाल गटातील अव्वल स्थानावर फारसा परिणाम करणार नाही.

प्रत्येक गटातील टॉप दोन टीम सुपर फोर फेरीत पदार्पण करतील, ज्यात चार संघ सहभागी होतील. येथे भारत आणि पाकिस्तान दोघेही पात्र होण्याची शक्यता प्रबळ आहे. सुपर फोर मध्ये सर्व टीम एकमेकांशी खेळतील, त्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यात दुसरा सामना निश्चित आहे. ही फेरी स्पर्धेचा मुख्य टप्पा असून, गुणतालिका रिसेट होईल.

सुपर फोर मधील अव्वल दोन टीम अंतिम फेरीत भिडतील. जी 28 सप्टेंबर रोजी खेळवली जाईल. जर भारत आणि पाकिस्तान दोघेही टॉप दोनमध्ये राहिले, तर तिसरा सामना अंतिम फेरीत होईल. दोन्ही टीमच्या मजबूत कामगिरीचा विचार करता ही शक्यता बरीच जास्त आहे. ज्यामुळे क्रिकेट फॅन्सना 3 वेळा या कट्टर प्रतिस्पर्धी टीम पाहायला मिळतील.

आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात किमान दोन (गट आणि सुपर फोर) आणि जास्तीत जास्त तीन सामने होण्याची शक्यता आहे. हे समीकरण गटातील इतर सामन्यांच्या निकालावर अवलंबून आहे. या भिडती जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी उत्साहवर्धक असतील.