ओमानविरुद्धच्या सामन्यात बुमराहला विश्रांती ?

टीम इंडिया आशिया कप 2025 च्या सुपर-4 फेरीत प्रवेश करून आधीच बाजी मारली आहे. आता गटातील शेवटचा सामना भारताला ओमानविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना निकालाच्या दृष्टीने औपचारिक असला तरी त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताचा स्टार पेसर जसप्रीत बुमराहला या सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते. जर त्याला विश्रांती दिली तर मग कोणाला संधी मिळणार? हाही मोठा प्रश्न आहे.

भारताने सलग विजय मिळवत गटात टॉपवर मजल मारली आहे. अशा स्थितीत सुपर-4 मधील कडक सामन्यांपूर्वी संघ व्यवस्थापन मुख्य गोलंदाजाला तंदुरुस्त ठेवू इच्छिते. कारण, जर भारत अंतिम फेरीपर्यंत गेला तर 7 दिवसांत 4 सामने खेळावे लागतील. त्यामुळे बुमराहला ताजेतवाने ठेवणं संघासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने 28 धावांत दोन विकेट घेत दमदार कामगिरी केली होती आणि भारतासाठी टी20 आयमध्ये चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.

जर बुमराह बाहेर बसला, तर या फॉर्मेटमध्ये भारताचा सर्वाधिक विकेट घेणारा अर्शदीप सिंह प्लेइंग-11 मध्ये येण्याची शक्यता प्रबळ आहे. त्याच्यासाठी हा सामना ऐतिहासिक ठरू शकतो कारण तो 100 टी20आय विकेटच्या टप्प्यापासून फक्त एका बळीवर दूर आहे. अर्शदीप व्यतिरिक्त हर्षित राणाचे नावही चर्चेत आहे, पण अनुभव आणि विक्रमाच्या उंबरठ्यावर असल्याने अर्शदीपची निवड जवळपास निश्चित मानली जाते.

ओमानविरुद्धचा सामना भारतीय फलंदाजांसाठीही उपयोगी ठरेल. यूएई आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांमध्ये काही टॉप आणि मिडल ऑर्डर खेळाडूंना क्रीजवर पुरेसा वेळ मिळाला नाही. सुपर-4 च्या कठीण सामन्यांपूर्वी त्यांना जास्त वेळ खेळण्याची ही सुवर्णसंधी असेल.