सोमवारी ठाण्यात अखेर पहिली मेट्रो धावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मेट्रो 4 मार्गिकेची चाचणीला सुरुवात झाली. घोडबंदर भागातील आनंद नगर या भागातील ठाण्यातील मेट्रोची पहिली ट्रायल रन झाली आहे. ट्रायल रनचा पहिला टप्पा घोडबंदर मार्गावरील गायमुख ते विजयनगरी दरम्यान असेल.
दरम्यान मेट्रो 4 ही देशातील 58 किमीची सर्वात लांब मेट्रो मार्गिका असणार आहे. याचा फायदा 21 लाख प्रवाशांना होणार आहे. तसंच, मेट्रो 4 मार्गिकेमुळं ठाणेकरांना थेट सीएसएमटी गाठता येणार आहे. मेट्रो ट्रायल रन यशस्वी झाल्यानंतर मेट्रो लवकरच ठाणेकरांच्या सेवेत सुरू होईल, ज्यामुळे प्रवाशांचे वेळेचे आणि प्रवासाचे मोठे फायदे होतील.
मेट्रो मार्गिकेचा उपयोग ठाणे शहर आणि उपनगरांतील लाखो प्रवाशांसाठी होणार आहे. भविष्यात हा मार्ग मुंबईतील इतर मेट्रो मार्गांशी जोडला जाईल, ज्यामुळे प्रवास अधिक सोयीस्कर आणि वेगवान होईल. मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर ठाणेकरांचा मुंबई, नवी मुंबई, वडाळा, भांडुप आणि घोडबंदरकडे प्रवास अधिक जलद आणि आरामदायक होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज म्हटलं आहे की, ठाणेकरांसाठी हा मार्ग महत्त्वाचा असणार आहे. मेट्रो 4ची लांबी 32 किमी आणि 4अ ची लांबी 35 किमी असी असणार आहे. या संपूर्ण मेट्रो मार्गिकेवर 32 स्थानके आहेत. हा मार्ग पूर्णपणे सुरू झाल्यानंतर 13 लाख 47 हजार प्रवाशांची संख्या अपेक्षित आहे. तसंच, मोघरपाड येथे डेपोकरता जागा उपलब्ध करुन देण्यात आली असून 45 हेक्टर जागा त्या ठिकाणी उपलब्ध झाली असल्या मुळे मेट्रो 4 मेट्रो 4 अ मेट्रो 10 आणि 11 डेपो म्हणून काम होणार आहे.
कोणत्या मार्गिकांना जोडणार?
मुंबई मेट्रो मार्ग-४ (वडाळा – कासारवडावली)
वडाळा ते कासारवडवली मेट्रो मार्ग 4 हा 32.32 किमी लांबीचा उन्नत मार्ग आहे. सदर मार्गामध्ये एकूण 30 स्थानके असतील. सदर मार्ग सध्याच्या ईस्टर्न एक्स्प्रेस रोडवे, मध्य रेल्वे, मोनोरेल, सध्या सुरू असलेला मेट्रो मार्ग 2ब (डी एन नगर ते मंडाळे), मेट्रो मार्ग 5 (ठाणे ते कल्याण), मेट्रो मार्ग 6 (स्वामी समर्थनगर ते विक्रोळी) यांच्यात परस्पर जोडणी प्रदान करेल. सदर मार्ग मुंबईतील व्यावसायिक आणि महत्त्वाच्या भौगोलिक ठिकाणांवर रेल आधारित प्रवेश प्रदान करेल.
