मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर सरकारने थेट जीआर काढून ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिलं. यासोबतच हैद्राबाद गॅझेटही लागू केले. मात्र, त्यानंतर ओबीसी समाज नाराज असल्याचे बघायला मिळतंय. ओबीसींच्या आरक्षणासाठी मंत्री छगन भुजबळ हे मैदानात उतरले आहेत. नुकताच छगन भुजबळ यांनी ओबीसी बांधवांना आत्महत्या न करण्याचे आवाहन केले. छगन भुजबळ यांनी म्हटले की, आत्महत्या करण्याच्या वाटेला अजिबात जाऊ नका, काळजी करू नका. आपलं आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत. मला खात्री आहे की, आम्ही त्यामध्ये विजय मिळवणार.
कोर्टात आम्ही पाच अर्ज दाखल केले आहेत आणि चांगले वकील त्यासाठी उभे आहेत. आमचे जे वकील आहेत, ते सांगतात की, आपल्याला यामध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आम्ही दोन्ही मार्गाने प्रयत्न करत असताना कोणीही आत्महत्येचा विचार करता कामा नये. किंबहुना सर्वांनी शक्ती लावून जिथे जिथे आपल्याला सभा घेता येतील ते बघावे. आम्ही आता बीडला सभा घेतोय, या तिथे.
पुढे छगन भुजबळ म्हणाले, प्रचंड महासागर लोकांना दाखवूया जनतेचा. ओबीसीमधील वेगवेगळ्या समाजाचे जे नेते आहेत, ते देखील आपआपल्या परीने सभा घेत आहेत. मोर्चे काढत आहेत. महात्मा फुले परिषदेतर्फे देखील वेगवेगळ्या जिल्हांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना पत्रे दिली जात आहेत आणि काही ठिकाणी लोक उपोषण देखील करत आहेत. वेगवेगळ्या समाजाचे लोक ओबीसींच्या हक्कासाठी बाहेर पडले आहे.
दलित समाज, मागासवर्गीय, आदिवासी या समाजाचा देखील आपल्याला पाठिंबा आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ठरून दिलेल्या गोष्टी आहेत. 340 अंतर्गत ओबीसीमधील छोट्या छोट्या जातींना काही मदत केली असे स्पष्ट म्हटले आहे. 341 मध्येही त्यांनी याची मांडणी केली असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. सरकारने स्थापन केलेल्या ओबीसी आरक्षणासंदर्भातील उपसमितीमध्ये छगन भुजबळ सदस्य आहेत. मात्र, सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल काढलेल्या जीआरनंतर छगन भुजबळ नाराज असल्याचे सांगितले जाते.
