शिंदेंच्या होमग्राऊंडवरील दिघेंच्या देवी दर्शनासाठी पोहोचल्या रश्मी ठाकरे !

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे गुरुवारी नवरात्रीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात होत्या. रश्मी ठाकरेंनी येथील तलावपाळीजवळील टेंभीनाक्यावरील देवीचं दर्शन घेतलं. एकनाथ शिंदेंचे राजकीय गुरु धर्मवीर आनंद दिघेंचा नवरात्रोत्सव म्हणून टेंभीनाक्यावरील हा उत्सव ठाणेकरांमध्ये प्रसिद्ध आहे. आनंद दिघेंनी स्थापन केलेल्या ठाण्यातील टेंभीनाका येथील दुर्गेश्वरी मातेची रश्मी ठाकरेंनी मनोभावे पूजा केली. रश्मी ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसोबत देवीचे आशीर्वाद घेतले. यावेळी शिवसेना नेते आणि माजी खासदार राजन विचारेही उपस्थित होते. तसेच ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या विशाखा राऊत, डॉ. ज्योती ठाकरे, जिल्हाप्रमुख केदार दिघेही उपस्थित होते. ठाकरेंच्या शिवसेनेचे इतर पदाधिकारी, महिला आघाडी व शिवसैनिक उपस्थित होते. रश्मी ठाकरेंनी या देवीच्या मंडपापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आनंद दिघेंच्या अर्धाकृती पुतळ्याचंही दर्शन यावेळेस घेतलं. या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते त्यातच रश्मी ठाकरे येणार असल्याने इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली. तुफान गर्दीमध्ये रश्मी ठाकरे चालतच मंडपापर्यंत आल्या.