डीजेचा दणदणाट वरपित्याच्या जीवावर बेतला…… जागेवरच जीव गेला

सोलापूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, डीजेचा (DJ) सुरु असलेला दणदणाट वरपित्याच्या जीवावर बेतला आहे. मुलाच्या हळदीच्या वरातीत सहभागी झालेल्या वडिलांचा डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे जागेवरच कोसळून मृत्यू झाला आहे.

विशेष म्हणजे त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांचा उपचाराआधीच मृत्यू झाला. पंढरपूरमध्ये सोमवार (1 जानेवारी) रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घडली आहे. या घटनेनंतर लग्नघरात शोककळा पसरली होती. सुभाष देवमारे (वय 58 वर्ष) असे दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

अधिक माहितीनुसार, पंढरपूर येथील सुभाष देवमारे यांच्या मुलगा अमित देवमारे या तरुणाचा 2 जानेवारी रोजी दुपारी लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे सोमवारी रात्री नरदेवाची हळदीची वरात काढण्यात आली. यावेळी डीजेचा दणदणाट सुरु होता. नवरदेवाची हळदीची वरात पंढपूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक, चौफाळा व पुढे काळा मारुती मंदिरासमोर आल्यानंतर डीजेचा आवाज मोठ्या प्रमाणात होता. त्या कर्णकर्कश आवाजामुळे रात्री 9 वाजेच्या सुमारास वरपिता सुभाष देवमारे हे जागेवरच कोसळले. अमित देवमारे यांचा मंगळवारी लग्न असल्याने सोमवारी रात्री नरदेवाची हळदीची वरात काढण्यात आली. यावेळी मोठ्या आनंदाचे वातावरण होते.

विशेष म्हणजे हळदीच्या वरातीत डीजे देखील लावण्यात आला होता. परंतु, डीजेचा प्रचंड आवाज वाढवण्यात आला होता. याच डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे अनेकांना त्रास देखील होत होता. याचवेळी वरपिता सुभाष देवमारे अचानक जमिनीवर कोसळले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. नातेवाईकांमध्ये घबराट पसरली. सुभाष देवमारे यांना नातेवाईकांनी तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचाराआधीच सुभाष देवमारे यांचा मृत्यू झाला. त्यामळे, डीजेचा कर्कश आवाज आणि दणदणाटामुळे वरपिता देवमारे यांचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरू आहे.देवमारे कुटुंबात लग्न असल्याने मागील काही दिवसांपासून याची जोरदार तयारी सुरु होती.

सर्व कुटुंबातील सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. तर, सोमवारी असलेल्या हळदीच्या कार्यक्रमानिमित्ताने देखील कुटुंबात आनंद पाहायला मिळत होता. मात्र, डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे वरपिता सुभाष देवमारे अचानक जमिनीवर कोसळले आणि यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे काही वेळात लग्नघरात शोककळा पसरली असल्याचे चित्र होते.