महाराष्ट्रात पूरस्थितीचे संकट गंभीर होत चाललंय. मराठवाड्यात आलेल्या पूराने हाहाकार माजला आहे. शेतीचे व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला मोठा पूर आल्यानंतर गावच्या गावं उद्ध्वस्त झाले आहेत. हजारो हेक्टरवरील शेती खरडून निघाली आहे. मराठवाड्यावर आलेले हे महासंकट सावरण्यासाठी हजारो लोक मदतीचा हात पुढे करत आहेत. अशातच सध्या पुण्यातील एका भाजीविक्रेत्याची जोरदार चर्चा आहे. या भाजीविक्रेत्याने शेतकऱ्यांसाठी लाखमोलाची मदत केली आहे.
भाजी विक्रेत्या चरण नामदेव वनवे यांनी राज्यातील पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाख 13 हजार 740 रुपयांचा निधी दिला आहे. आपण नेहमी समाजाला काही देत राहावं, या भावनेने त्यांनी पूरग्रस्तांसाठी मदत केली आहे.
‘माझ्या घरात शंकर महाराजांच्या पादुका आहेत. शंकर महाराजांच्या पादुकांसमोर एक डबा ठेवला आहे. दररोज जी कमाई झाली त्यातील थोडासा हिस्सा मी त्या डब्यात ठेवतो. ज्या वेळेस राज्यावर नैसर्गिंक आपत्ती येईल तेव्हा तो डब्बा फोडायचा. किती निघालेत काय ते बघायचे नाही. त्यात आपल्या खिशातील 4-5 हजार टाकायचे. मी काल तो डबा फोडला. त्यात 1 लाख 13 हजार 740 रुपये निघाले. ती कॅश मी बँकेत जमा केली आणि चेक बनवून तो मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला,’ असं चरण वनवे यांनी म्हटलं आहे.
‘मी शेतकऱ्यांची दुखः जवळून बघितली आहे. मी ताटावर बसलो असताना त्यांचे आभार मानल्याशिवाय जेवत नाही. मी शेतकऱ्यांच्या आशीर्वादावर रोज इतकी छान भाजी विकतो ती त्यांच्या जीवावर शेतकरी हा जगला पाहिजे. आपण नेहमी समाजाला काही देत राहावं,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.
